उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचाच परिणाम आता जिल्ह्यातून जाणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर पहायला मिळत आहे. गंगा नदीच्या किनारी मोठ्या संख्येने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकडं आणि पैसे कमी असल्याने पारंपारिक पद्धतीने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृतदेह जमीनीमध्ये पुरुन गंगा नदीच्या किनाऱ्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतांची संख्या इतकी आहे की आता या ठिकाणी मृतदेह जमीनीमध्ये पुरण्यासाठीही जागा शिल्लक राहिली नाहीय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मागील महिन्याभरामध्ये तीनशेहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश मृतदेह खड्डे खोदून किनाऱ्याजवळ पुरण्यात आलेत. आता येणाऱ्या मृतदेहांना पुरण्यासाठी बक्सर आणि रौतापुरमधील किनाऱ्यांवर जागा शिल्लक नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

उन्नावमधील ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. मरण पावलेल्यांपैकी अनेकांना खोकला, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. अशाप्रकारे ग्रामीण भागांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात असण्याची शक्यता येथील स्थानिकांनी व्यक्त केलीय. उन्नावमधील रौतापुरमध्ये गंगा घाटावर ३०० च्या आसपास मृतदेह पुरण्यात आले आहेत. हे प्रमाण इतके आहे की या ठिकाणी आता मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी, मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. मृतदेह दफन करण्यासाठी गंगेच्या किनाऱ्यावर रेती कमी पडू लागलीय. येथे सध्या एका खुल्या जागेवर मृतदेहांना चितेवर ठेऊन मुखाग्नि देत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या शेतांमध्येही काहीजण मृतदेह दफन करुन जाताना दिसत आहे.

रौतापूर, मिर्जापूर, लँगडापूर, भटपुरवा, राजेपूर, कानिकामऊ, फत्तेपूरसहीत अनेक गावांमधील लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या ठिकाणी गुरं चारण्यासाठी येणाऱ्या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाला या ठिकाणी ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात, असं न्यूज १८ शी बोलताना सांगितलं. यापूर्वी येथे दिवसाला केवळ एक दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. एवढ्या मोठ्याप्रमाणात येते अंत्यसंस्कार केले जात असल्याने गावांमध्येही करोना संसर्गाची भिती व्यक्त केली जात आहे.

उन्नावमधील बक्सर येथील गंगा किनाऱ्यावर मोठ्या संख्येने मृतदेह दफन करण्यात आले आहेत. जिथे हे अंत्यसंस्कार करण्यात आलेत आता तिथे पाण्याचा प्रवाह वाहू लागलाय. या ठिकाणची जमीन ओलसर झाली आहे. अनेक ठिकाणी पुरलेल्या मृतदेहांवरील माती वाहून गेल्याने ते उघड्यावर पडले आहेत. या ठिकाणी भटकी कुत्रीही मोठ्या संख्येने फिरताना दिसत आहेत.

आणखी वाचा- चिंतेत आणि रुग्णसंख्येत भर… मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक

प्रसारमाध्यमांशी बोलताना उन्नावचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी बक्सरमध्ये गंगा किनाऱ्यावर मृतदेह दफन करुन अंत्यसंस्कार केली जात असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं. यासंदर्भातील तपास करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अंत्यसंस्कारांसंदर्भात काही चुकीचं घडल्याची माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही कुमार यांनी सांगितलं आहे. काही मृतदेहांवरील वाळू वाहून अथवा उडून गेल्याने ते उघड्यावर पडल्याचेही दिसून येत असल्याचं कुमार यांनी सांगितलं. आम्ही यासंदर्भात योग्य कारवाई करु असं रवींद्र म्हणालेत. या मृतदेहांमधून करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. या ठिकाणी आमच्या काही टीम गेल्या आहेत. केवळ मृतदेह पाहून त्यांना करोना संसर्ग झालेला की नाही सांगता येणार नाही. आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असं जिल्हाधिकारी म्हणालेत.