उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपाने निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. संगीता सेनगर भाजपाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत.

कुलदीप सेनगर हे भाजपा आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.

गतवर्षी भाजपाने पक्षातून बडतर्फ केलेले कुलदीप सेनगर यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने सेनगर यांना दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसंच १० लाखांचा दंडही ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगर यांचा दावा आहे. दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.