नवी दिल्ली : उन्नाव येथील अपघातग्रस्त बलात्कार पीडितेला उपचारांसाठी लखनौ येथून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत हलवायचे किंवा नाही याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची तिच्या कुटुंबीयांना मुभा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उन्नाव येथील बलात्कार पीडित महिलेच्या मोटारीस ती काकांना भेटण्यासाठी रायबरेलीला जात असताना ट्रकने धडक दिली होती त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत तिच्यावर लखनौ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील व्ही. गिरी यांच्या निवेदनाची नोंद घेऊन हे मत व्यक्त केले आहे. गिरी यांनी असे सांगितले होते की, सदर मुलगी बेशुद्ध असून तिला कृत्रिम श्वासयंत्रणेवर ठेवले आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारांसाठी सध्या लखनौ रुग्णालयातच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकरणात न्यायमित्र म्हणून वकील गिरी हे भूमिका पार पाडत आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले आहे की, पीडितेला उपचारांसाठी हवाई रूग्णवाहिकेतून लखनौहून दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत हलवायचे की नाही याचा निर्णय घेण्याची मुभा तिच्या कुटुंबीयांना देण्यात येत आहे. न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांचा समावेश असलेल्या पीठाला न्यायमित्र गिरी यांनी अशी माहिती दिली की, पीडितेसमवेत गाडीत असलेले वकील अपघातात जखमी झाले.  त्यांची कृत्रिम श्वासयंत्रणा काढली असली तरी प्रकृती गंभीरच आहे.