05 August 2020

News Flash

‘उन्नाव पीडितेचे पत्र पीठासमोर मांडण्यास विलंब का?’

सरन्यायाधीशांचा संतप्त सवाल, सर्वोच्च न्यायालयात आजपासून तातडीने सुनावणी

(संग्रहित छायाचित्र)

सरन्यायाधीशांचा संतप्त सवाल, सर्वोच्च न्यायालयात आजपासून तातडीने सुनावणी

 नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नावच्या बलात्कार पीडित तरुणीने तिला येत असलेल्या धमक्यांबद्दल आपल्या नावे लिहिलेले पत्र तत्काळ पीठासमोर का मांडले गेले नाही, अशी संतप्त विचारणा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी बुधवारी केली.

याप्रकरणी गुरुवारी सकाळी सुनावणी सुरू होणार आहे. ‘हे पत्र १७ जुलैला आल्याचे मंगळवारी दुपारी चार वाजता मला समजले. आज मी काही वृत्तपत्रांत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयही मौन बाळगून असल्याचे वाचले. प्रत्यक्षात ते पत्र मी वाचलेले नाही. ते माझ्यापर्यंतच आलेले नाही. त्यामुळे या वृत्तांनी मी व्यथित झालो. तरीही या पत्राच्या अनुषंगाने वेगाने पावले उचलणार आहोत,’असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

आपल्याला तसेच कुटुंबियांना हत्येच्या धमक्या येत आहेत, असे पत्र या तरुणीने सरन्यायाधीशांना लिहिले होते. तिच्या मोटारीला झालेल्या भीषण आणि संशयास्पद अपघातानंतर बुधवारी त्या पत्रातील तपशील माध्यमांमध्ये झळकला.  सरन्यायाधीश गोगोई यांनी सांगितले की, १७ जुलैला हे पत्र न्यायालयास मिळाल्याची नोंद आहे. मग ते पीठासमोर ठेवण्यात विलंब का झाला, याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी तातडीने द्यावा. बलात्कार पीडित तरुणीच्या गाडीला झालेल्या अपघाताबाबतचा स्थितीदर्शक अहवाल देण्याचे आदेशही सरन्यायाधीशांनी उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरूद्ध बोस यांचा समावेश असलेल्या न्यायपीठासमोर ही सुनावणी होत आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या अनुषंगाने बाल लैंगिक गुन्ह्य़ांबाबत चिंता व्यक्त करीत न्यायालयाने स्वत:च हा विषय सुनावणीला घेतला असून ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. गिरी हे न्यायमित्र म्हणून बाजू मांडत आहेत.

पत्रातील तपशिलानुसार ७ जुलैला कुलदीर सेनगर याचा भाऊ शशी सिंह याचा मुलगा नवीन सिंह आणि कुन्नु मिश्रा  याने घरी येऊन पीडितेला  व तिच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती. नंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक जण घरी आला होता. त्या पत्रासोबत हे लोक ज्या मोटारीतून आले होते त्याची चित्रफीतही देण्यात आली होती. हे पत्र सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच अलाहाबाद उच्च न्यायालय आणि उत्तर प्रदेश सरकारलाही देण्यात आले होते.

सीबीआयकडून खुनाचा गुन्हा

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेच्या मोटारीस रविवारी रायबरेली येथे ट्रकने दिलेल्या धडकेत साक्षीदारासह तिच्या दोन नातेवाईक महिला ठार तर तसेच  ती व तिचे वकील गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणी आता सीबीआयने चौकशी हाती घेतली असून नव्याने दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालात भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर व इतर दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयचे पथक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्य़ात गुरूबक्षगंज भागात पोहोचले आहे. तेथे या अपघातानंतर पहिला गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. नेहमीच्या पद्धतीनुसार सीबीआयने पोलिसांकडून तपास हाती घेताना नव्याने गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे काका महेश सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आधीचा गुन्हा दाखल केला होता. महेश सिंह हे एका गुन्ह्य़ाच्या प्रकरणात सध्या रायबरेली तुरुंगात असून पीडिता तिची काकू व मावशी यांच्यासह त्यांना भेटण्यासाठी मोटारीने निघाली असता ट्रकने वाहनास धडक दिली होती.

महेश सिंह यांनी असा आरोप केला की, सेनगर याच्याकडून आमच्या कुटुंबावर सतत दबाव होता. त्याच्या वतीने काही लोक आम्हाला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप महेश सिंह यांनी केला असून सीबीआय पथकाने रायबरेली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी केंद्राने या प्रकरणाची चौकशी उत्तर प्रदेश सरकारच्या शिफारशीवरून सीबीआयकडे दिली होती. पीडिता सध्या १९ वर्षांची असून तिच्यावर २०१७ मध्ये भाजप आमदार सेनगर याने बलात्कार केला होता. रविवारी पीडिता मोटारीने काकांना भेटण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिली होती. ट्रक विरुद्ध दिशेने येत होता व त्याच्या नंबर प्लेटला काळे लावण्यात आले होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी या अपघाताच्या प्रकरणी भाजप आमदार सेनगर याच्यासह दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात कार अपघातामागे पीडितेला साक्षीदारांसह ठार मारण्याचा  कट असल्याचा संशय व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 5:09 am

Web Title: unnao rape case sc seeks report on delay in placing letter of victim zws 70
Next Stories
1 ‘तिहेरी तलाक’बाबत सरकारने फसवले; विरोधकांचा आरोप
2 विद्यार्थ्यांसाठी उत्तम शहरात लंडन क्यूएस क्रमवारीत प्रथम
3 पाणीवाटप तंटय़ांचे निश्चित कालावधीत निवारण
Just Now!
X