राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरवर केलेल्या आरोपांना सीबीआयने दुजोरा दिला आहे तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगरला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचेही स्पष्ट केले आहे. पीडित तरुणी उत्तर प्रदेशातील माखी गावात राहते. कुलदीप सिंह सेंगरने मागच्यावर्षी चार जूनला घरात घुसून आपल्यावर बलात्कार केला त्यावेळी त्याची महिला साथीदार शशी सिंह दरवाजाबाहेर पहारा देत होती असा आरोप पीडित तरुणीने केला होता. या आरोपाला सीबीआयने दुजोरा दिला.

या प्रकरणात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. सरकार आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप झाल्यानंतर निष्पक्ष तपासासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. उत्तर प्रदेशातील बांगरमऊ येथून आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेंगरवर पीडित तरुणीने सुरुवातीपासून बलात्काराचा आरोप केला आहे.

या प्रकरणी २० जूनला एफआयआर आणि त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रात स्थानिक पोलिसांनी कुलदीप सिंह सेंगर आणि अन्य आरोपींच्या नावाचा समावेश केला नाही. सीबीआयने कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे पीडित तरुणीची जबानी नोंदवून घेतली. ही जबानी देताना पीडित तरुणी तिच्या आरोपांवर ठाम होती. कलम १६४ अंतर्गत नोंदवलेली जबानी कोर्टापुढे पुरावा म्हणून ग्राहय धरली जाते.
स्थानिक पोलिसांनी पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीला विलंब केला तसेच तिचे कपडे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले नाहीत.

आरोपींशी हातमिळवणी करुन जाणीवपूर्व सर्व गोष्टींना विलंब लावण्यात आला असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. सेंगर, शशी सिंह आणि अन्य आरोपींना सीबीआयने १३ आणि १४ एप्रिलला अटक केली. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. स्थानिक पोलिसांची यामध्ये नेमकी काय भूमिका आहे त्याचा सीबीआयकडून तपास सुरु आहे.

भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरची पीडितेच्या मागणीनुसार उन्नाव तुरूंगातून सीतापूरच्या तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी सेंगर याला उन्नाव जेलमधून हलवावं यासाठी पीडितेने उच्च न्यायालयात मागणी केली होती. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी अजून झालेली नाही, मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने सेंगरला सीतापूर तुरूंगात हलवलं आहे.