उन्नाव बलात्कार प्रकरणाशी संबंधित विविध घटनांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणीत वाढत चालल्या आहेत. या बलात्कार प्रकरणाचे केंद्रीय राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांनी कोंडीत पकडल्यामुळे योगी बॅकफुटवर ढकलले गेले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगींकडे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

उन्नाव प्रकरणाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे तसेच योगींनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन तात्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोदी सरकारच्या मोहिमेवरुन त्यांना लक्ष्य केले आहे. मुलींना वाचवा आणि स्वतहाच त्यांना मारा असे उपरोधिक टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

योगींच्या भाजपासोबत आघाडी करणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीनेही या मुद्यावरुन योगींवर टीका केली आहे. योगी आघाडी धर्माचे पालन करत नसल्याचे एसबीएसपीचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांजवळ हा मुद्दा मांडणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणाचा घटनाक्रम

– मागच्यावर्षी जून महिन्यात भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांचा भाऊ अतुल सिंहने आपल्यावर बलात्कार केला होता असा आरोप पीडित तरुणीने केला.

– रविवारी पीडित तरुणीनमे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

– त्यानंतर कालच पीडित महिलेच्या वडिलांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनीच हत्या घडवून आणली असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.