भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडितेच्या काकू आणि अन्य एका नातेवाईकाचा मृत्यू झाला, तर तिचे वकील देखील अपघातात गंभीर जखमी आहेत. पण हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पीडितेच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे, तसंच सीबीआय चौकशीची मागणी केली जातेय. मात्र या खटल्याशी संबंधित एखाद्या घटनेवर संशय व्यक्त होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, यापूर्वीही अनेकदा पीडितेच्या कुटुंबीयांसोबत अनेक अपघात झालेत त्यामुळे वारंवार घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय.

खटला दाखल करण्यासाठी मोठी लढाई –
उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेला न्यायासाठी मोठी लढाई लढावी लागली आहे. अनेकदा तक्रारी करुनही पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता. यांतर पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली, आमदार सेंगर यांना अटक झाली, उच्च न्यायालयाने फटकारल्याने सीबीआयने तपासाची गती वाढवली.

पीडितेच्या वडिलांचा मृत्यू –
पीडितेने वर्ष 2017 मध्ये भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात सेंगर यांच्या अटकेनंतर पीडित कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या, त्यांना सातत्याने धमक्या मिळत होत्या. याच दरम्यान पीडितेच्या वडिलांचा कारागृहातच मृत्यू झाला. उन्नाव जिल्हा कारागृहातून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांना 5 एप्रिल रोजी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याघटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर वडिलांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आपल्या आरोपपत्रात आमदार सेंगर यांच्यासह 5 जणांच्या नावाचा समावेश केला होता.

…वडिलांच्या हत्येनंतर महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू –
पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाच्या साक्षीदाराचाही अचानक मृत्यू झाला. अचानक आजारी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मृत झालेल्या साक्षीदाराच्या नातलगांनीही शवविच्छेदन न करता घाईघाईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या मृत्यूनंतर पीडितेच्या काकांनी उन्नावचे पोलीस अधिकारी हरीश कुमार यांच्याकडे पुन्हा शवविच्छेदनाची विनंती देखील केली होती. 18 ऑगस्ट रोजी या महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू झाला होता.

आता दोन नातेवाईकांचा मृत्यू, पीडिता गंभीर –
आता या प्रकरणात एक नवा ‘अपघात’ झाला आहे. रविवारी(दि.28) झालेल्या या अपघातात एका बेदरकार ट्रकने पीडितेच्या कारला जोरदार धडक दिली. कारमध्ये त्यावेळी पीडिता, तिचे नातेवाईक आणि वकील होते. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पीडितेच्या काकू आणि अन्य एक नातेवाईक ठार झाले, तर पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासर्व घडामोडींमुळे पीडितेसोबत होणाऱ्या या घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.