उन्नाव बलात्कार प्रकरण चिघळल्यानंतर भाजपाने आमदार कुलदीप सेनगर यांना दूर सारले आहे. कुलदीप सेनगर यांना २०१८ मध्ये अटक झाल्यानंतर लगेच पक्षातून निलंबित करण्यात आले होते, असा खुलासा उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या निलंबनाचा कोणताही लेखी पुरावा न दाखवल्याने भाजपाच्या या खुलाशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

उन्नाव बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलीने तत्कालीन भाजपाचे आमदार कुलदीप सेनगर यांच्याविरूद्ध फिर्याद दिली होती. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पीडितेच्या कारला झालेल्या भीषण अपघातात कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यु झाला. याप्रकरणातही कुलदीप सेनगर यांच्यावर गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेला विरोधकांनीही संसदेत लावून धरल्याने भाजपाने कुलदीप सेनगर यांना अखेर धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांनी कुलदीप सेनगरला निलंबित केल्याचा खुलासा केला. ते म्हणाले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी हे ठामपणे सांगतो की, सेनगरला गेल्यावर्षीच भाजपातून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची वाय श्रेणीतील सुरक्षाही लगेच काढून घेण्यात आली होती. अपघातातील जखमींच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकार सर्वोतोपरी मदत करीत आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे.

मात्र, सेनगरला निलंबित केल्याचा कोणताही पुरावा सिंग यांनी सादर केला नाही. तसेच लोकसभा निवडणूक प्रचारात सेनगर यांच्या पत्नी संगीता सेनगर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत व्यासपीठावर कशा दिसल्या, या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. तर लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर साक्षी महाराजांनी तुरूंगात जाऊन घेतलेल्या सेनगर यांच्या भेटीवर उत्तर देण्याचेही टाळले.