स्वतंत्र गोरखालँडची मागणी करणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुकारलेल्या बेमुदत बंदच्या पाचव्या दिवशीही दार्जिलिंगमध्ये तणाव कायम होता. संघटनेच्या समर्थकांनी सोमवारी मोर्चे काढले, तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतळे जाळले. दरम्यान, सुरक्षा दलांच्या जवानांनी रस्त्यांवर गस्त घातली आणि सलग दुसऱ्या दिवशी या भागातील इंटरनेट सेवा बंद होत्या.

हातात काळे झेंडे घेतलेल्या निदर्शकांनी, विशेषत: तरुणांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत चौकबाजार भागात मोर्चा काढला. त्यांनी ममता बॅनर्जी यांचे पुतळे जाळले आणि गोरखालँडसाठीचा लढा सुरूच ठेवण्याची प्रतिज्ञा केली.

या आंदोलनात आमचे ३ कार्यकर्ते ठार झाले आहेत. आम्ही प्राण देण्यास तयार आहोत, परंतु गोरखालँड मिळेपर्यंत आमची निदर्शने थांबवणार नाही, असे जीजेएमच्या एका कार्यकर्त्यांने सांगितले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दार्जिलिंगच्या निरनिराळ्या भागात सोमवारी लहान-लहान मोर्चे काढले.

दरम्यान, या पर्वतीय भागातील इंटरनेट सेवा सलग दुसऱ्या दिवशीही बंद होत्या. जीजेएमच्या कार्यकर्त्यांनी ‘प्रक्षोभक संदेश’ पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करू नये यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जीजेएमने पुकारलेल्या बेमुदत बंदच्या पाचव्या दिवशीही परिस्थिती तणावाची असल्यामुळे सुरक्षा दलांच्या जवानांनी रस्त्यांवर गस्त घातली. सकाळपासून हिंसाचाराची कुठलीही घटना घडलेली नाही, मात्र आम्ही अतिशय दक्ष असून कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दार्जिलिंगमधील सध्याच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने २२ जूनला सिलिगुडी येथे बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत या मुद्दय़ाशी संबंधित सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर अडथळे

गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या एका कार्यकर्त्यांच्या शनिवारी आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दार्जिलिंग जिल्ह्य़ातील काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३१ अ अडवून धरला. ९२ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ३१ अ हा दार्जिलिंग जिल्ह्य़ातील सेवोकला गंगटोकशी जोडतो आणि तो सिक्किमची जीवनरेखा मानला जातो. या महामार्गाचा जवळपास ३० किलोमीटर भाग पश्चिम बंगालमधून जातो.