संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने सीरियाचा रासायनिक अस्त्रांचा साठा नष्ट करण्याचा एकमुखी ठराव मतैक्याने संमत केला असून सीरियाने अस्त्रे नष्ट केली नाहीत तर त्याचे फार गंभीर परिणाम त्या देशाला भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
सीरियाकडील रासायनिक अस्त्रे व त्यांनी दमास्कसजवळ केलेला रासायनिक अस्त्रांचा केलेला हल्ला याबाबत राजनैतिक शिष्टाईस आज अखेर यश आले. रशिया व अमेरिका यांच्यात सीरियातील रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याबाबत समझोता झाला होता. २१ ऑगस्ट रोजी दमास्कसच्या एका उपनगरात करण्यात आलेल्या हल्ल्यात १३०० जण ठार झाले होते.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस, बान की मून यांनी सांगितले की, सीरियाची रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याचा ठराव ही अतिशय आशादायी बातमी असून येत्या नोव्हेंबर अखेरीस आपण सीरियातील यादवी युद्धाच्या संदर्भात शांतता परिषद घेणार आहोत. सीरियाचा लोकशाही भविष्यकाळ शांततामय मार्गाने कसा घडवायचा हे आता संबंधितांवर अवलंबून आहे. ज्यांचा  कुणाचा तेथील राजकीय पक्ष व गटांवर प्रभाव आहे तो त्यांनी चांगल्या कारणासाठी वापरावा. सीरियातील ऑगस्टमध्ये झालेल्या रासायनिक अस्त्र हल्ल्याची संयुक्त राष्ट्रांच्या पथकाने पुष्टी केली असून नंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने सीरियात शांतता नांदण्यासाठी सर्व रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यात असे म्हटले आहे की, सीरियाने लवकरात लवकर रासायनिक अस्त्रे नष्ट करावीत, तेथील कुठलाही पक्ष, गट यांनी रासायनिक अस्त्रे यांची निर्मिती करू नये, संयुक्त राष्ट्रांच्या संहिता सातचे पालन करावे. जर रासायनिक अस्त्रे नष्ट केले नाहीत तर कडक र्निबध लादले जाऊ शकतात. या ऐतिहासिक ठरावावर बान की मून यांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून आपण सीरियात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे सांगत होतो, आता ते स्पष्ट झाले आहे. सीरियात मोठय़ा प्रमाणात रासायनिक अस्त्रे, हातबॉम्ब, बंदुका, रणगाडे यांचा वापर करण्यात आला आहे. केवळ रासायनिक अस्त्रांना लाल बावटा दाखवला याचा अर्थ इतर पारंपरिक शस्त्रांनी लोकांना मोकळीक आहे असा याचा अर्थ नाही. सर्व प्रकारचा हिंसाचार थांबला पाहिजे,  असे या ठरावात म्हटले आहे.