लखनऊ येथे तब्बल १२ तासांपासून पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक बुधवारी पहाटे संपुष्टात आली. यावेळी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) भोपाळ-उज्जैन ट्रेन स्फोटाशी संबंधित असलेल्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

लखनऊच्या वेशीवरील असलेल्या ‘हाजी कॉलनी’ नामक दाट वस्तीतील एका घरात मध्य प्रदेशातील स्फोटाशी संबंधित एक दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तातडीने त्या घराला वेढा घातला होता. त्याभोवतीच्या घरांतील रहिवाशांना तातडीने तेथून बाहेर काढण्यात आले. घरात दडून बसलेल्या दहशतवाद्याला शरण येण्यास अनेकदा सांगण्यात आले, मात्र त्याने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यास बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. एटीएसचे जवान व दहशतवादी यांच्यात सातत्याने गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. दरम्यान, आज पहाटे  या कारवाईत  सैफुल्ला हा दहशतवादी ठार झाला. आम्ही दहशतवाद्याला बाहेर काढण्यासाठी चिली बॉम्बचाही वापर केला. मात्र, आम्ही आतमध्ये शिरायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात सैफुल्ला मारला गेला, अशी माहिती मध्य प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी दिली. दरम्यान, आम्ही मायक्रो कॅमेऱ्याद्वारे दहशतवादी लपलेल्या खोलीची रेकी केली तेव्हा त्याठिकाणी दोन दहशतवादी असल्याचे वाटले होते. मात्र, आतमध्ये आल्यानंतर याठिकाणी केवळ एकच दहशतवाही असल्याचे स्पष्ट झाल्याचेही चौधरी यांनी सांगितले. हा दहशतवादी इसिसच्या खोरसाना मॉड्यूलशी संबंधित असल्याचा संशय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या ज्या टप्प्यासाठी प्रचाराचा प्रचंड जोर लावला होता त्या टप्प्यातील मतदान आज, बुधवारी होत असताना मंगळवारचा दिवस राज्यासाठी सनसनाटी ठरला. मंगळवारी सकाळी भोपाळ-उज्जन पॅसेंजर गाडीत घडविण्यात आलेल्या स्फोटात १० प्रवासी जखमी झाल्यानंतर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात तपासाची चक्रे वेगाने फिरली व काहीजणांना ताब्यात घेण्यात आले. तर, लखनौमध्ये रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या चकमकनाटय़ात एक दहशतवादी जबर जखमी झाला. भोपाळ-उज्जन पॅसेंजर गाडीतील स्फोटाशी त्याचा संबंध असावा, असा संशय असून, त्याचे लागेबांधे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मतदानामुळे बंदोबस्त असलेल्या उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील रेल्वेगाडीत मंगळवारी सकाळी स्फोट झाला. भोपाळहून उज्जनला निघालेल्या पॅसेंजर गाडीत पावणेदहाला हा स्फोट झाला. त्यात दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हा स्फोट नेमका कशाचा होता, याबाबत तातडीने काही सांगण्यात आले नाही. मात्र काही वेळाने, ‘हा बहुदा दहशतवादी हल्ला असावा’, असा अंदाज वर्तविण्यास मध्य प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. आणि पुढे काही वेळातच ‘हा दहशतवादी हल्लाच होता’, अशा ठाम निष्कर्षांप्रत ते पोहोचले. आधुनिक स्फोटक उपकरणांद्वारे तो घडवल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर या स्फोटाशी संबंधित अशा तिघांना मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्य़ातील पिपारिया येथे अटक करण्यात आली. तर एका व्यक्तीस उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अटक करण्यात आली.