19 November 2019

News Flash

बार काउन्सिलच्या अध्यक्षाची कोर्टाच्या आवारात हत्या

दरवेश यादव यांची सहकारी वकिलानेच न्यायालयाच्या आवारात गोळया झाडून हत्या केली.

उत्तर प्रदेश बार काउन्सिलच्या अध्यक्ष दरवेश यादव यांची सहकारी वकिलानेच आग्रा न्यायालयाच्या आवारात गोळया झाडून हत्या केली. दोन दिवसांपूर्वीच दरवेश यांची बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आग्रा जिल्हा न्यायालयात कार्यक्रम सुरु असताना त्यांच्यावर गोळया झाडण्यात आल्या.

मनिष असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्याने दरवेश यादव यांच्या  स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम सुरु असताना  मनिषने त्यांच्यावर तीन गोळया झाडल्या. पोलीस गोळीबाराच्या कारणांचा शोध घेत आहेत.

गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात तणाव वाढला असून वकिलांच्या गटांनी उद्यापासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरवेश यादव निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. कार्यक्रम सुरु असताना मनिष यादव आपल्या जागेवरुन उठला व त्याने गोळीबार सुरु केला असे पीटीआय प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे. त्यानंतर त्याने लगेच स्वत:वर गोळया झाडल्या.

दरवेश यादव मूळच्या इटाहच्या आहेत. उत्तर प्रदेश बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. यादव यांची बहिण मुझफ्फरनगरमध्ये पोलीस अधिकारी आहेत. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. भारतीय बार काउन्सिलने या घटनेचा निषेध केला असून उत्तर प्रदेश सरकारने दरवेश यादव यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

First Published on June 12, 2019 5:41 pm

Web Title: up bar council chief darvesh yadav shot dead in agra court
Just Now!
X