उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांचं समर्थन सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. भाजपा आमदाराने डॉक्टरांवर टीका करताना आज अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये १० रुपयांची एक गोळी १०० रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत. पुढे सुरेंद्र सिंह यांनी अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना राक्षस म्हटलं आहे. अ‍ॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत आहेत, असं सुरेंद्र सिंह म्हणालेत.

नक्की वाचा >> “लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत, १००० मेलेत… हे कसले डॉक्टर”; रामदेव यांचे आणखीन एक वादग्रस्त विधान

“रुग्णाच्या मृत्यूनंतर अ‍ॅलोपॅथी डॉक्टर रुग्णाला आयसीयूमध्ये ठेऊन पैसे वसूल करतात,” असा आरोपही सुरेंद्र सिंह यांनी केलाय. सामाजाने आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि योग अभ्यास या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असं आवाहन भाजपा आमदाराने केले. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीची तुलना करताना सुरेंद्र सिंह यांनी दोन्ही उपचार पद्धती समान असल्याचं म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह यांनी आपण मनापासून बाबा रामदेव यांचं अभिनंदन करतो असंही म्हटलं आहे. रामदेव बाबांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सदृढ भारत, सशक्त भारत मोहीम सुरु केली असून हे काम कौतुकास्पद आहे. सुरेंद्र सिंह यांनी बाबा रामदेव यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं. याच वेळी बोलताना सुरेंद्र सिंह यांनी, “रुग्णांची काळजी घेण्यासाठी अगदी मानापासून काम करणाऱ्या अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचं मला कौतुक आहे. मात्र याच अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी काहीजण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो,” असंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला”; बिहार भाजपाध्यक्षांची पोस्ट चर्चेत

यापूर्वीही सुरेंद्र सिंह यांनी गोमूत्र नियमितपणे प्यायल्याने करोनाचा संसर्ग होत नाही असा दावा केला होता. आपला दावा सिद्ध करण्यासाठी सुरेंद्र सिंह यांनी गोमूत्र पितानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत व्हायरलही केला होता. या व्हिडीओमध्ये सुरेंद्र सिंह यांनी आपण नियमितपणे गोमूत्र पितो असं सांगताना दिसत आहे. गोमूत्रामुळे आरोग्य ठणठणीत राहतं असं सांगताना सर्वांनी गोमूत्राचं सेवन करावं असंही सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. गोमूत्र सेवन केल्याने करोनाबरोबरच इतर अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होईल असा दावा त्यांनी केलाय.