उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील संकटे संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. राज्यातील दलित नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर आता भाजपाचा सहकारी पक्ष अपना दलच्या आमदाराने योगी आदित्यनाथांवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ हे अनुभवहीन मुख्यमंत्री असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांने ज्या पद्धतीने काम करायला हवे, तसे करताना ते दिसत नाहीत. राज्याची परिस्थिती बिघडली असून त्यांची पाच वर्षे शिकण्यातच जातील, असा टोला आमदार हरिराम चेरो यांनी लगावला. विशेष म्हणजे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे आज लखनऊच्या दौऱ्यावर आहेत. त्याचदरम्यान चेरो यांनी हे वक्तव्य केले आहे.

आमदार चेरो हे सोनभद्रमधील दुद्धी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. चेरो यांनी योगी आदित्यनाथांवर अवैध खाणप्रकरणात अनियमिततेविषयीही आरोप करत त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली. अधिकारी वर्ग योगींची दिशाभूल करत आहेत. तक्रारीवर कारवाई होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांमध्ये अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे ते काम करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कामात वेग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

माझा मतदारसंघ खूप मागास आहे. हे वाळू उपसा करण्याचे क्षेत्र आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलला आहे. खुलेआम चार-चार पोकलेनने उपसा केला जात आहे. याप्रकरणी तक्रारी केली. पोलिसांच्या देखभालीत उपसा होत आहे. आता पोलिसांच्या संरक्षणाखाली सर्व होत आहे. यावरून लक्षात येतं की योगी व्यवस्थित काम करत नाहीत. ‘आज तक’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

सरकार सत्तेवर येऊन पाच वर्षे झाली. त्यांना पाच वर्षे शिकण्यातच जातील. असंच काम करत राहिले तर भाजपाचा विजयरथ संकटात येईल. आमचा पक्ष ही युतीत आहे. मलाही पुन्हा आमदार व्हायचं आहे. सरकारची अशीच कार्यशैली राहिली तर मी पुन्हा आमदार होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.