उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात (सपा) सध्या अजूनही अंतर्गत धूसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाचे सुप्रिमो मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये अखिलेश समर्थकांचे तिकिट कापण्यात आले आहे. मुलायम सिंह यांच्या निर्णयामुळे अखिलेश समर्थकांमध्ये खळबळ माजली असून रात्री उशिरा काही मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन आपला असंतोष व्यक्त केला आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री रामगोविंद चौधरी, अरविंद सिंह गोप व पवन पांडे यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अखिलेश यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत मुलायम सिंह यादव यांना भेटून ज्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना उमेदवारी देण्याची विनंती केली, असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आपल्या समर्थकांची नावे कापल्यामुळे चिडलेल्या अखिलेश यादव यांनी आज (गुरूवार) आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राजकीय भूमिका ठरवण्यात येणार आहे. या घटनेमुळे नाराज असलेले अखिलेश यादव एखादा महत्वाचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित करू शकतात, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

झाशी आणि महोबा दौऱ्यावरून लखनौला परतल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपला राग शिवपाल यादव समर्थकांवर काढला आहे. त्यांनी गृहनिर्माण विकास परिषदेचे उपाध्यक्ष व शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय सुरभी शुक्ला यांना पदावरून हटवले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी सुरभी यांचे पती डॉ. संदीप शुक्ला यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते. डॉ. शुक्ला हे उत्तर प्रदेश राजकीय निर्माण पालिकेच्या सल्लागारपदी होते. त्यांना सुलतानपूर येथील सदर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. या दोघा पती-पत्नींना शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय मानले जाते. आपल्या उमेदवारांना तिकिट न मिळाल्यामुळे अखिलेश यांनी हा पलटवार केल्याचे बोलले जाते. आमदारांच्या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा होऊ शकते. समर्थक आमदारांशी सल्ला मसलत करून पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटप करण्यात शिवपाल यादव यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. अखिलेश यांच्या नापसंत नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.