मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे.अशात आता यूपीच्या शेतकऱ्यांसाठी मात्र अच्छे दिन आले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याची घोषणा निवडून येताच केली आहे. आजच पिक कर्जमाफी योजना लागू करण्यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. देशातल्या तीन राज्यांमध्ये होणारे शेतकरी आंदोलन आणि कर्जमाफीची एकमुखी मागणी यातून धडा घेऊन योगी आदित्यनाथ सरकारने उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याच्या हालचालांनी गती दिल्याची चर्चा रंगते आहे.

आज झालेल्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी अर्थ विभागाला शेतकऱ्यांच्या पिक कर्जमाफीची योजना राबवण्यासंबंधी सूचना केल्या आहेत. राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर तातडीने अल्प आणि मध्यम  भू धारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये जो तणाव पेटला आहे त्याचे लोण उत्तर प्रदेशात पोहचू नये म्हणून योगी सरकारने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. राज्यातल्या ८६ लाख अल्प भू धारक आणि मध्यम शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत कर्ज घेतलेल्या अल्प आणि मध्यम भू धारक शेतकऱ्यांना, बँकांनी कोणत्याही प्रकारे वसुलीच्या नोटीसा पाठवू नये असेही निर्देश आदित्यनाथ यांनी अर्थ विभागाला दिले आहेत. ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येईल. तसेच या योजनेचा लाभ ज्यांना मिळेल, त्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या खात्यातशी जोडण्यात येईल. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार हे निश्चित झाले आहे.