उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमानाच्या जातीबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी केवळ इतकंच म्हणालो होतो की, जे उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत किंवा दुर्बळ आहेत अशांना बजरंगबली शक्ती देतो. माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला’.

योगी आदित्यनाथ बुधवारी संध्याकाळी बिहारची राजधानी पाटणामध्ये होते. तेथे त्यांनी महावीर मंदिरात पूजा केली, त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार येथे योगींनी त्यांच्या हनुमानाच्या जातीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, मी हनुमानाच्या जातीचा उल्लेख केलाच नाही असं ते म्हणाले. लोकशाहीमध्ये विजय आणि पराजय होत असतात, आम्ही विजय स्वीकारला त्याप्रमाणे आता पराजय देखील स्वीकारतो. पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विरोधकांनी दुष्प्रचार केला, आमची रणनिती योग्य होती. खोटं बोलून सत्ता मिळवणाऱ्यांबाबत सत्य समोर येईल असं ते म्हणाले.

राजस्थानच्या अलवार येथे एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी, ‘हनुमान हे वनवासी होते. ते उपेक्षित, दलित होते. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिमधील संपूर्ण हिंदुस्थानी समाजाला संघटित करण्याचे कार्य त्यांनी केले’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठ्या प्रमाणात वाद उफाळून आला होता आणि हनुमान किंवा मारूतीराया कोणत्या जातीचा होता याची चांगलीच चर्चा रंगली होती.