राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजपने शक्तीप्रदर्शन केले. कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेही उपस्थित होते. त्याचबरोबर सुमारे २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएच्या सर्व मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली होती. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीरा कुमार यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरवल्यामुळे ही लढाई आता दलित विरूद्ध दलित अशी झाली आहे. काँग्रेसने लोकांमध्ये भांडणं लावण्यासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसला जर मीरा कुमार यांना राष्ट्रपती बनवायचे असते तर मागील वेळीच त्यांना संधी दिली असती. पण भाजपने रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केल्यानंतर लोकांमध्ये वाद व्हावेत यासाठी त्यांनी मीरा कुमार यांना निवडले, असे आरोप त्यांनी केला. बसप प्रमूख मायावती आणि आरजेडी प्रमूख लालूप्रसाद यादव यांच्यावरही निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांची अवस्था ‘खिसियानी बिल्ली खंबा नोचे’ सारखी झाल्याचा टोला लगावला. मीरा कुमार या लोकसभेच्या माजी अध्यक्ष आहेत. दिवंगत दलित नेते आणि माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या त्या कन्या आहेत.

दरम्यान, रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जातो आहे. ‘देशाचे संविधान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. देशाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मी जेव्हापासून राज्यपाल झालो आहे, तेव्हापासून मी कोणत्याही पक्षाचा नाही. राष्ट्रपती पद आणि राजकारणाचा कोणताही संबंध असू नये,’ असे रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले.