उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या ११२ च्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. अशाप्रकारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाहीय. मात्र असं असलं तरी पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केलाय.

नक्की वाचा >> नायट्रोजनपासून ऑक्सिजन बनवण्याबद्दल भाष्य केल्याने योगी ट्रोल; लोक म्हणाले, ‘नावं बदलून बघा’

समोर आलेल्या माहितीनुसार २९ एप्रिल रोजी सायंकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या ११२ या क्रमांकाच्या व्हॉट्सअप एका अज्ञात क्रमांकावरुन मेसेज पाठवून योगींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीमध्ये मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. पुढील चार दिवसात माझं जे काही करायचं आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असं या धमकीत म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ऑक्सिजनचा तुटवडा असला तरी बोंबाबोंब कराल तर…; योगी सरकारचा रुग्णालयांना इशारा

थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या मेसेजमुळे पोलीस विभागामध्ये एकच गोंधळ उडालाय. धमकी ज्या क्रमांकावरुन आलीय त्या क्रमांकाचा तपास करण्यासाठी एक सर्व्हिलन्स टीम स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी येथील कंट्रोल रुममध्ये ११२ चे ऑप्रेशन कमांडर अंजुल कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम स्थापन करण्यात आलीय. ही टीम या प्रकरणामधील तपासावर लक्ष ठेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी मदत करणार असल्याचं टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “धन्य ते योगीजी आणि धन्य ते मोदीजी”; भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एका १५ वर्षीय मुलाने ११२ याच आपत्कालीन सेवा क्रमांकावर मेसेज पाठवला होता. मोबाईल क्रमांकाच्या आधारे या मुला शोध घेतला असता तो आग्रा येथील असल्याचं समजलं. करोनामुळे शाळा बंद असल्याने वैतागलेल्या या मुलाने थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मेसेजमधून दिली होती. या मुलाला अटक करुन बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं.

समजून घ्या : X, Y, Z दर्जाची सुरक्षा कोणाला, कशासाठी आणि कशी दिली जाते?; यासाठीचा खर्च कोण करतं?

योगी यांना झेड प्लस दर्जाची व्हिआयपी सुरक्षा देण्यात आलीय. २०१७ पासून त्यांना ही सुरक्षा देण्यात आली असून ते जिथे जातात तिथे त्यांच्या आजूबाजूला २५ ते २८ कमांडोजचे संरक्षण कडं असतं.