उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या गायींच्या मृत्यूंप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. रात्री उशिरा मिर्झापूरचे मुख्य पशू चिकित्सा अधिकारी, अयोध्येचे बीडीओ यांच्यासहीत एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. अयोध्याचे जिल्हाधिकारी, मुख्य चिकित्सा अधिकारी आणि मिर्झापूरच्या डीएमना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच गायींच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी विंध्याचलच्या आयुक्तांकडे सोपवली आहे.

प्रयागराज आणि मिर्झापूर येथील गायींच्या मृत्यूंना जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही म्हटलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या, हरदोई, रायबरेली, मिर्झापूर, प्रयागराज, सीतापूर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. गायींबाबत निष्काळजीपणा केला आणि त्यांचा मृत्यू झाला तर निष्काळजीपणा केल्याबद्दल गोहत्या अधिनियम आणि पशू क्रूरता निवारण कायद्यान्वये कारवाई केली जाईल असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

रायबरेली आणि हरदोईचे जे डीएम आहेत त्यांना दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. तसेच सगळ्याच जिल्ह्यांच्या डीएमनी गोशाळांची पाहणी करावी. जर तिथे योग्य सोयी सुविधा नसतील तर त्या लवकरात लवकर कशा पोहचतील हे पहावं असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बाराबंकी, रायबरेली, हरदोई, जौनपूर, आजमगढ, सुल्तानपूर, सीतापूर या ठिकाणी गोशाळांमधल्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे गायींचा मृत्यू झाला. त्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारने आठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.