News Flash

“उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे रुग्ण वाढले, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या?” योगी आदित्यनाथ यांचा सवाल!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना रुग्णवाढीसंदर्भात उत्तर प्रदेशची तुलना महाराष्ट्र, दिल्लीशी केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी करोनाबाबत उत्तर प्रदेशची तुलना महाराष्ट्र आणि दिल्लीशी केली.

गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशची देखील चर्चा केली जात आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीकिनारी मोठ्या संख्येनं मृतदेह आढळल्यानंतर या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येनं करोना रुग्णांची आकडेवारी लपवली जात आहे, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांमुळे रुग्णवाढ झाली, मृतांचे आकडे लपवण्यासाठी गंगेमध्ये मृतदेह टाकून देण्यात आले असे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना रुग्णवाढीसंदर्भात थेट महाराष्ट्र आणि दिल्लीशी तुना केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील करोना परिस्थितीवर भाष्य केलं.

मृत्यूचे आकडे लपवणं हे पाप!

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी मृतांचे आकडे लपवण्यात आल्याच्या आरोपांवर भूमिका मांडली. “मृत्यूचे आकडे लपवणं हे पाप आहे. पण करोनासारख्या साथीच्या रोगाशी लढा देणाऱ्या एका व्यवस्थेसोबत आपलीही जबाबदारी काय असायला हवी? लोकांचं मनोबल वाढवणं की त्यांच्यात भिती निर्माण करणं? मी बघत होतो की बरेच लोक चांगले होते, पण इतकी भिती आणि चिंता निर्माण केली जात होती, की लोक म्हणायचे आम्ही आता मरून जाऊ. मला आश्चर्य वाटायचं. इतकं भितीचं वातावरण निर्माण केलं गेलं होतं”, असं ते म्हणाले.

“आपण स्मशानभूमीचं चित्र दाखवत होतो आणि सांगत होतो की हॉस्पिटलमध्ये एक आकडेवारी दिली जातेय आणि घाटावर इतके मृत्यू होत आहेत. मी म्हणतो घरात इतर कारणांनी मृत्यू होणाऱ्यांचे देखील अंत्यसंस्कार होतच होते. पण त्या नावावर संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. भितीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. करोनामुळे हे सगळे मृत्यू होत आहेत असं भासवल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली”, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला.

राज्यावलोकन : योगींचे आव्हान कायम?

महाराष्ट्र, दिल्लीशी केली उत्तर प्रदेशची तुलना

दरम्यान, यावेळी करोना रुग्णांच्या आकडेवारीविषयी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची तुलना महाराष्ट्र आणि दिल्लीशी केली. “कधी म्हटले की उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून करोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या का? दिल्लीत निवडणुका होत्या का? महाराष्ट्र किंवा दिल्लीमध्ये कुंभमेळा होता का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

…तर तो अन्याय होईल!

“आपण करोनासाठी आस्थेला किंवा संविधानात्मक संस्थांना लक्ष्य करू लागलो, तर ते चूक होईल. तो अन्याय होईल. हे या शतकातलं सगळ्यात मोठं संकट आहे. आपल्याला या संकटाविरुद्ध सामुहिकपणे लढा द्यावा लागेल. ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळे एकत्र येऊन लढलो, तर ते मानवतेसाठी फायदेशीर ठरेल”, असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 10:46 pm

Web Title: up cm yogi adityanath on corona situation in maharashtra delhi uttar pradesh pmw 88
Next Stories
1 बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विश्वस्त पदावरुन वॉरेन बफे पायउतार
2 “पंतप्रधान स्वत:ची पाठ थोपटून घेत होते आणि दुसऱ्याच दिवशी…!” प्रियांका गांधींनी केंद्राला सुनावलं!
3 ऑस्ट्रेलियात अटकेत असलेल्या विशालच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री खट्टर यांचे प्रयत्न, परराष्ट्रमंत्र्यांशी केली चर्चा
Just Now!
X