विद्यार्थ्यांनी पदवी मिळवल्यानंतर लगेचच नोकरीच्या मागे धावू नये असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या चौथ्या दिक्षांत समारंभात बोलताना योगी यांनी हे मत व्यक्त केलं आहे. ‘पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करावा,’ असं योगी म्हणाले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंजिनियरींगचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतात. प्रत्येक घरासाठी नळ या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी समोर यायला हवं. ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून याचा उद्देश प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं असल्याचे त्यांनी नमूद केले.

इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नोकरीच्या मागे धावण्याची घाई न करता समाजासाठी काम करण्याचा सल्ला दिला. तसेच इंजिनियरींगचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा वापर करुन योगदान करु शकतात असंही योगी यावेळी म्हणाले. प्रत्येक घरात नळ जोडणी करण्याच्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवं. प्रत्येक घरामध्ये पिण्याचे पाणी नळाच्या माध्यमातून पोहचवण्याची योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची योजना असून त्यामध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे अशी इच्छा योगी यांनी बोलून दाखवली आहे.

वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी टेक्निकल इन्स्टीट्यूटसारख्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी समोर येण्याची गरज आहे. याशिवाय गरीब मुलांसाठी घरे बविण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी योगदान देण्याची गरज असल्याचे योगी यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे सरकारी योजना राबवणे सोपे झाल्याचेही योगी यावेळी म्हणाले. “तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा जनतेपर्यंत पुरवठा करणं अगदीच सोपं झालं आहे. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक केल्याचा फायदा रेशन वाटपामध्ये झाला आहे. अनेक ठिकाणी रेशनच्या दुकानांमध्ये सेल मशिन लावण्यात आले आहे,” अशी माहिती योगींनी दिली.

मागील २५ वर्षांपासून मी इन्सेफेलाइटिस या आजारासंदर्भात काम करत आहे. १९७७ ते २०१७ या कालावधीत या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र राज्यात (उत्तर प्रदेशमध्ये) भाजप सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही या आजारासंदर्भात अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबविले आहेत. या सर्वांचा इन्सेफेलाइटिसविरुद्ध लढा देण्यास मदत झाल्याचा दावा योगी यांनी केला आहे.

“५० कोटी लोक मोदी सरकारने सुरु केलेल्या आयुषमान भारत योजनेशी जोडले गेले आहेत. तर अडीच कोटी लोकांना घरांचे वाटप करण्यात आले आहे,” असे योगी भाषणाच्या शेवटी म्हणाले. या कार्यक्रमामध्ये इन्फोसेसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी मानद पदवी प्रदान करण्यात आली. योगी यांनी मुर्ती यांचेही अभिनंदन यावेळी केले.