UP CM Yogi Adityanath उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सुतोवाच केले आहे. महापुरूषांच्या जयंतीला शाळांना सुट्टी न देता विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. जेणेकरून त्यांना त्यादिवशी महापुरूषांबद्दल चार गोष्टी शिकवात येतील, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. योगी आदित्यनाथ यांची सध्याची कार्यपद्धती पाहता त्यांनी मनात आणल्यास या निर्णयाची अंमलबजावणी सहजपणे होऊ शकते. मात्र, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्ट्यांवर संक्रांत येणार आहे.

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शिक्षणात नवनवीन बदल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता शाळांमध्ये योग शिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमात ‘योग’चा समावेश करण्यात आला आहे. शारीरिक शिक्षण राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे गिरवावे लागणार आहेत. तसेच राज्यातील शाळांमध्ये आता नर्सरीपासूनच इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय यूपी सरकारने घेतला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून इंग्रजीचे शिक्षण दिले जात आहे. शिक्षण व्यवस्थेत संस्कृती आणि आधुनिकता यांच्यात समतोल साधायला हवा, असे योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

योगी आदित्यनाथ यांनी शालेय शिक्षण विभागात पारदर्शकतेला प्राधान्य दिले आहे. राज्यातील शाळांमध्ये पारदर्शीपणे शिक्षक भरती करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. परीक्षांच्या कालावधीत कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे.