राय बरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर त्यांच्या आजीनेच छळ केल्याचा आरोप केला आहे. संपत्तीसाठी आदिती सिंह आपला छळ करत आहेत अशी तक्रार कमला सिंह यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरु केला आहे.

रायबरेलीचे पोलीस अधीक्षक स्वप्निल मामागेन यांनी अतिरिक्त एसपी नित्यानंद राय यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवली आहे. “रायबरेलीच्या कोटावली पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी तक्रार नोंदवण्यात आली. संपत्तीचा वाद आणि छळाचा आरोप आहे. अतिरिक्त एसपी नित्यानंद राय यांना आरोपांची चौकशी करण्यात सांगण्यात आले आहे. पण आतापर्यंत तक्रारदार किंवा कुटुंबातील सदस्य जबानी नोंदवण्यासाठी आलेले नाहीत” असे मामागेन यांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार ८५ वर्षीय कमला सिंह महाराजगंजमधील लालुपूर चौहान गावामध्ये राहतात. ३० डिसेंबर २०१९ रोजी आदिती आणि अन्य नातेवाईक आपल्या घरात घुसले व संपत्ती त्यांच्या नावावर केली नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली असे कमला सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी फोन कॉल्सला प्रतिसाद दिला नाही. हा कौटुंबिक विषय असल्यामुळे आदिती यांना या वादावर बोलायचे नाही असे त्यांच्या जवळ असलेल्या सूत्रांनी सांगितले.