उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलं आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. मास्क, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन ही त्रिसुत्री वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलायत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जातील. करोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील.

राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहून हे नवे नियम लागू करण्यात आलेत. शहरी भागांमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यास २० घरं सील केली जातील आणि त्या भागाला कंटेनमेंट झोन असं जाहीर केलं जाईल. एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ६० घरं सील करुन त्यांना कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील, असं एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आणखी वाचा- करोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट! २४ तासांत एक लाखांहून अधिक नवे रुग्ण; ५०० मृत्यू

इमारतींसाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या मजल्यावर करोना रुग्ण आढळून आला तर संपूर्ण मजला सील केला जाईल. एखाद्या ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढल्यास त्या इमारतीला कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर कंटेनमेंट झोनमधून या इमारतींचं नाव हटवलं जाईल.

आणखी वाचा- “मास्क घालण्याची गरज नाही, कारण आसाममधून करोना गेला”; भाजपाच्या मंत्र्याचं विधान

उत्तर प्रदेशचे अपर मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये राज्यात करोनाचे चार हजार १६४ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात १९ हजार ७३८ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आठ हजार ८८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत तीन कोटी ५४ लाख १३ हजार ९६६ चाचण्या झाला आहेत. रविवारी ७८ हजार ९५९ नमुने आरटी पीसीआर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.