फेसबुकचा संस्थापक-अध्यक्ष मार्क झकरबर्ग याच्याविरोधात उत्तर प्रदेशच्या लखनऊ न्यायालयात येथे तक्रार दाखल झाली आहे. वकील ओमकार द्विवेदी यांनी मार्क झकरबर्ग आणि कंपनीच्या अन्य तीन भागीदारांविरोधात तक्रार केली आहे, यामध्ये भारतातील फेसबुकचे प्रमुख अजित मोहन यांचाही समावेश आहे.

फेसबुकने चुकीच्या पद्धतीने देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांचा वापर केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या लेटरपॅडचा वापर त्यांच्या परवानगीविना केल्याचा आरोप द्विवेदी यांनी केला आहे. 12 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल. फेसबुकच्या एका अॅपमध्ये देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे असा आऱोप द्विवेदी यांनी केला आहे. यामुळे माझ्या भावना दुखावल्या आणि देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान झाल्याचं द्विवेदी यांनी म्हटलं आहे.

याशिवाय, मार्क झकरबर्गला हटविण्यात यावे अशी मागणी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुकचा डेटा हॅक होत असल्याच्या घटना जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी होत आहे. इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंट्रोलर स्कॉट स्ट्रींगर यांनी मिळून कंपनीकडे हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मोठमोठ्या अॅसेट मॅनेजरचे समर्थन मिळेल असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. असे असले तरीही सध्या फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झकरबर्ग याच्याकडेच आहेत. एप्रिल महिन्यात कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही भागीदारी ६० टक्के इतकी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.