उत्तर प्रदेश सरकारने गाईंसाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ‘गोरक्षा चिकित्सा मोबाईल व्हॅन्स’ सेवेचा शुभारंभ केला आहे. या सेवेच्या माध्यमातून आजारी आणि जखमी गाईंना गोशाळेत नेण्यात येणार आहे. गोशाळेत गायींवर उपचार करण्यात येईल. यासोबतच रुग्णवाहिकेतही गायींवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

गोरक्षा चिकित्सा मोबाईल व्हॅनची सुविधा सुरुवातीच्या कालावधीत अलाहाबाद, गोरखपूर, लखनऊ, मथुरा आणि वाराणसीत उपलब्ध असेल. मनरेगा मजूर कल्याण संघटनेच्या मदतीने ही सेवा पुरवण्यात येणार आहे. रुग्णवाहिका सेवेसोबतच मौर्य यांनी गोसेवा टोल फ्री नंबर सेवेचादेखील शुभारंभ केला. या टोल नंबरवर लोकांनी जखमी आणि आजारी गायींबद्दलची माहिती कळवावी, असे आवाहन केशव प्रसाद मौर्य यांनी केले आहे.

‘गायींनी दूध देणे बंद केल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांविरोधात संघटना कारवाई करेल. गायींनी रस्त्यावरील आणि कचरापेटीतील प्लास्टिक खायला लागू नये, याची काळजी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी,’ असे मजूर कल्याण संघटनेचे अध्यक्ष संजय राय यांनी म्हटले.

गायींसाठी रुग्णवाहिकेची सुविधा सुरु करणारे उत्तर प्रदेश राज्यातील दुसरे राज्य आहे. याआधी २७ एप्रिल रोजी मध्य प्रदेश सरकारने गायींसाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. ‘आमच्याकडे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. मात्र गायींना रुग्णालयापर्यंत आणणे आणि त्यांना उपचारांनंतर सोडणे हा वाहतुकीचा मुद्दा अडचणीचा ठरतो. अनेकदा जखमी गायींना योग्य वेळेत रुग्णालयात आणले जात नसल्याने त्यांना जीव गमवावा लागतो’, असे पशुसंवर्धन विभागाचे संचालक विल्सन दावर यांनी म्हटले.