उत्तर प्रदेशमध्ये खास गायींसाठी रूग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. ‘गोवंश चिकित्सा मोबाइल व्हॅन’ नावाच्या या सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी केले. आजारी, जखमी असलेल्या गायींना या रूग्णवाहिकेतून गोशाळा किंवा पशु चिकित्सालयात नेण्यात येईल. त्याचबरोबर एक ‘गो सेवा टोल फ्री’ क्रमांकही जारी करण्यात आला आहे. या टोल फ्रीवरून नागरिक गायींची मदत करू शकतात. या रूग्णवाहिकेत एक पशु वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक उपस्थित असेल. मौर्य यांनी अशा पाच रूग्णवाहिकांना हिरवी झेंडी दाखवली.

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून गो रक्षणावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पदभार हाती घेताच त्यांनी राज्यातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर अनेक नवीन योजनाही सुरू केली. अवैध कत्तलखान्यांबाबत आदित्यनाथ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर मोठ्याप्रमाणात टीकाही करण्यात आली. पण त्यांनी कारवाई थांबवली नाही.