News Flash

भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी विद्यार्थीनी बेपत्ता

बेपत्ता झालेली ही विद्यार्थीनी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील रहिवासी असून ती कायद्याचे पदव्युत्तर पदवीचे (एलएलएम) शिक्षण घेत आहे.

स्वामी चिन्मयानंद

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थीनीने हे आरोप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर ती गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाली आहे.

बेपत्ता झालेली ही विद्यार्थीनी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील रहिवासी असून ती कायद्याचे पदव्युत्तर पदवीचे (एलएलएम) शिक्षण घेत आहे. एक आठवड्यापूर्वी या विद्यार्थीनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर तिचा अद्याप थांगपत्ता नाही.

या व्हिडिओमध्ये संबंधित विद्यार्थीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, “माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, यामध्ये माझाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. ही व्यक्ती खूपच ताकदवान असून जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक देखील या व्यक्तीविरोधात  कारवाई करु शकणार नाहीत. आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे.”

दरम्यान, आपली मुलगी कॉलेजच्या हॉस्टेलवरुन बेपत्ता होण्यामागे स्वामी चिन्मयानंद यांचाच हात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून स्वामी चिन्मयानंद यांच्या विरोधात शहाजहांपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, स्वामी चिन्मयानंद यांच्या समर्थकांकडून एक विरोधी तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, स्वामी चिन्मयानंद यांना अज्ञातांकडून ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोन येत आहेत. या कॉलमधून अशी धमकी दिली जात आहे की, जर स्वामी चिन्मयानंद यांनी खंडणीची रक्कम दिली नाही तर त्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात येईल. अशा प्रकारे दोन्ही बाजूंकडून तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संबंधित विद्यार्थीनी शनिवारपासून (२४ ऑगस्ट) बेपत्ता आहे. बेपत्ता होण्यापूर्वी तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला असून यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

स्वामी चिन्मयानंद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये (१९९९-२००४) केंद्रीय मंत्री होते. या काळात ते उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. स्वामी चिन्मयानंद यांच्यावर यापूर्वीही बलात्कार आणि अपहरणाचे आरोप झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 5:16 pm

Web Title: up girl student missing after she accuses swami chinmayayand of sexual harassment aau 85
Next Stories
1 ”काश्मीर तर सोडाच आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा”
2 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवा विझवण्यासाठी सरसावला कोकणी माणूस, ब्राझीलला दिला हा इशारा
3 “श्रीकृष्णासारखी बासरी वाजवली तर गाई जास्त दूध देतात”
Just Now!
X