‘ठोक देंगे’ ही पॉलिसी चालणार नाही असं वक्तव्य AIMIM चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारीच केलं होतं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यामध्ये ओवेसी म्हणतात,  “विकास दुबेला अटक केल्यानंतर स्पेशल कोर्टाद्वारे त्याच्यावर खटला चालवा. त्याला जर चकमकीत ठार केलं गेलं तर ही उत्तर प्रदेश सरकारची ही ठोक देंगे पॉलिसी आहे. ही पॉलिसी चालणार नाही” असं ओवेसी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. दरम्यान आज सकाळीच पोलीस एन्काऊंटरमध्ये विकास दुबे मारला गेला. या घटनेनंतर ओवेसींची हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

आज काय घडलं?

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला. ३ जुलै रोजी विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर विकास दुबे फरार झाला होता. तेव्हापासून विकास दुबेचा शोध घेतला जात होता. तीन राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गुरुवारी विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या असून विकास दुबे ठार झाला.

गुरुवारी जेव्हा विकास दुबेला अटक झाली होती त्यानंतरच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत ते म्हणाले होते की उत्तर प्रदेश पोलिसांनी जर विकास दुबेला अटक केली आहे तर त्याच्यावर खटला चालवावा. त्यानंतर रितसर कोर्ट देईल ती शिक्षा द्यावी. ठोक देंगे धोरण अवलंबू नये. उत्तर प्रदेश सरकारचे हे धोरण चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आज सकाळी विकास दुबेचा एन्काऊंटर झाला. त्यानंतर ओवेसी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.