उत्तर प्रदेश सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी ज्या पाच जणांची नावे दिली होती ती राज्यपाल राम नाईक यांनी फेटाळून लावली. ज्या वर्गवारीत या पाच जणांची नावे देण्यात आली होती त्या वर्गवारीसाठी हे पाच जण अपात्र असून त्यापैकी काही जणांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी ज्या आमदारांच्या नावाची फाइल पाठविण्यात आली होती ती परत पाठविण्यात आल्याचे राज भवनातून जारी करण्यात आलेल्या पत्रकांत म्हटले आहे. कमलेश पाठक, संजय सेठ, रणविजयसिंह, अब्दुल सरफराज खान आणि राजपाल कश्यप अशी या पाच जणांची नावे आहेत. यापैकी काही जणांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ किंवा सामाजिक सेवा यापैकी एकाही वर्गवारीत या सदस्यांचे कोणतेही योगदान नाही किंवा अनुभव, ज्ञानही नाही त्यामुळे त्यांना नियुक्त करता येणार नाही, असेही राज्यपाल राम नाईक म्हटले आहे.