उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
उझनीचे मंडळ अधिकारी मुकेश सक्सेना यांची एसआयटीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक अतुलकुमार सक्सेना यांनी सांगितले.
विशेष पथकातील सदस्यांनी शुक्रवारी कटरा गावाला भेट देऊन तक्रारदार आणि साक्षीदार यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींची घरे उघडून अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणातील दोघा अज्ञात आरोपींची रेखाचित्रे काढण्यासाठी साक्षीदारांची मदत घेण्यात येत असून या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
शासकीय पातळीवरून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी सदर कोतवाली ठाण्याचे निरीक्षक वीरपाल सिरोही यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सिरोही यांना बी. एस. पुनिया आणि भारतकुमार हे अधिकारी तपासात सहकार्य करणार आहेत.