News Flash

धक्कादायक! विनयभंगप्रकरणी जामिनावर असलेल्या आरोपीनेच पीडितेच्या वडिलांची केली हत्या!

विनयभंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने पीडितेच्या वडिलांचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या हथरसमध्ये घडला आहे.

फोटो सौजन्य - इंडियन एक्स्प्रेस

देशात प्रत्येक वेळी महिला सबलीकरणाची चर्चा होत असताना दुसरीकडे देशातल्या महिलांवरचे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. मात्र, यासोबतच हे अत्याचार झाल्यानंतर अशा पीडित महिलांना न्याय मिळण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास आणि प्रसंगी जीविताला धोका निर्माण झाल्याचं अनेक प्रकरणांमध्ये समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या हथरसमध्ये नुकतीच अशीच एक घटना घडली असून यामध्ये विनयभंगप्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने पीडितेच्या वडिलांचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर एका व्यक्तीला हथरस पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे अशा जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींकडून पीडित मुलींना संरक्षण देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

काय होती घटना?

२०१८मध्ये हथरसच्या सासनी भागामध्ये हा प्रकार घडला होता. गावातल्या गौरव शर्मा या तरुणाने पीडितेचा विनयभंग केला होता. या प्रकाराविरोधात पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली. मात्र, महिन्याभरातच आरोपी जामिनावर बाहेर आला. तेव्हापासून पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता.

गोळ्या झाडून आरोपी निघून गेले

मात्र, सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे पीडिता पूर्णपणे हादरून गेली. पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील शेतामध्ये काम करत असताना तिची आई आणि ती स्वत: तिथे उपस्थित होते. त्याच वेळी आरोपी गौरव शर्मा, रोहितेश शर्मा, निखिल शर्मा आणि ललित शर्मा हे चौघे तिथे आले आणि त्यांनी पीडितेच्या वडिलांना तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी करायला सुरुवात केली. पीडितेचे वडील काही बोलायच्या आत आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि ते घटनास्थळावरून निघून गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव शर्मा आणि पीडितेचं काही वर्षांपूर्वी लग्न होणार होतं. मात्र, काही कारणांमुळे ते लग्न मोडलं. तेव्हापासून गौरव शर्मा लग्नाच्या मुद्द्यावरून पीडितेला त्रास देत होता. विनयभंग प्रकरणी गौरव शर्माला जुलै २०१८मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र, महिन्याभरात तो जामिनावर बाहेर आला. गेल्या वर्षी त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न देखील केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 5:10 pm

Web Title: up hathras sexual assault case accused killed victims father pmw 88
Next Stories
1 पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर निदर्शने
2 “सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली, पण ‘नवरा’ कोण आहे?”
3 Video: प्रियंका गांधींची ‘चाय की बात’; थेट मळ्यात जाऊन केली चहाच्या पानांची तोडणी
Just Now!
X