उत्तर प्रदेश, राजस्थान व हरयाणा या तीन राज्यांना पाऊस व गारपिटीचा सर्वात मोठा फटका बसला असून त्यांनी केंद्राकडे १०,१०० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली.
कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यात १४ राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला आहे. राज्यनिहाय माहितीचा तपशील देताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात २९.६४ लाख हेक्टर क्षेत्राला तर हरयाणात २२.२४ लाख हेक्टर क्षेत्राला पावसाचा तडाखा बसला आहे. राजस्थानात १६.८९ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र (९.८९ लाख हेक्टर), मध्य प्रदेश (५.७० लाख हेक्टर), पंजाब (२.९४ लाख हेक्टर), बिहार (१.८६ लाख हेक्टर), गुजरात (१.७५ लाख हेक्टर), जम्मू-काश्मीर (१.२२ लाख हेक्टर), हिमाचल प्रदेश (०.६७ लाख हेक्टर), पश्चिम बंगाल (०.४९ लाख हेक्टर), उत्तराखंड (०.३९ लाख हेक्टर) तर तेलंगणा व केरळात (प्रत्येकी ०.०१ लाख हेक्टर) क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान व हरयाणा यांनी अनुक्रमे ७४४.४८ कोटी, ८२५२ कोटी व ११३५.९१ कोटी रुपये भरपाईची मागणी केली आहे असे सिंह यांनी सांगितले. अनेक राज्य सरकारांना राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीची रक्कम भरपाईसाठी वापरण्यास सांगितले आहे. त्यापेक्षा जास्त अर्थसाह्य़ हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून दिले जाईल असे त्यांनी सांगितले.