उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. रविवारी शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूविरोधी असल्याचा आरोप करताना त्यांना इस्लामी दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे. ममता बॅनर्जी या देशासाठी सर्वात मोठा धोका आहेत अशी टीकाही शुक्ला यांनी केली आहे. इतकच नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागेल असंही शुक्ला म्हणाले आहेत.

बलिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना शुक्ला यांनी, “ममता बॅनर्जींना भारतीयतेवर विश्वास नाहीय. त्या इस्लामिक दहशतवादी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदू देवी-देवतांना अपमानित करण्याचं आणि मंदिरं तोडण्याचं काम केलं आहे. त्या बंगलादेशच्या इशाऱ्यावर काम करतात,” असे धक्कादायक आरोप केले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांना नागरिकत्व देणे, हिंदूंना त्यांचे सण साजरे करु न देणे यासारख्या गोष्टी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये करत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केलाय. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव होईल असं सांगताना शुक्ला यांनी या निवडणुकीनंतर ममतांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागेल, असंही म्हटलं आहे.

भारत माता की जय आणि वंदे मातरम बोलणाऱ्या मुस्लिमांचाच भारतात सन्मान केला जाईल, असंही शुक्ला म्हणाले आहेत. बंगलादेशमध्ये भाजपासोबत येथील बहुसंख्य जनता असल्याचा दावा शुक्ला यांनी केलाय. ममता या केवळ मुस्लिमांच्या नेत्या आहेत. त्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत. पश्चिम बंगालमधील जनतेने निवडणुकीमध्ये ममतांना सत्तेमधून खाली खेण्याचा निश्चय केलाय, असंही शुक्ला यांनी म्हटलं आहे.

आनंद स्वरुप शुक्ला

एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांवर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मागील दहा वर्षांपासून राज्यामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला भाजपाकडून जोरदार आव्हान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने वरिष्ठ तसेच वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आपल्या भाषणांमध्ये आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधून ममता बॅनर्जींवर निशाणा साधताना दिसत आहेत.