आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मुघलांशी निगडीत स्थळांचे नाव बदलण्याचे वक्तव्य केले होते. हाच धागा पकडून त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्याकडे कोणते काम नाही. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाव बदलण्याचे निमित्त पुढे करत आहेत. जर हिंमत असेल तर त्यांनी लाल किल्ल्याचे नाव बदलावे. किल्ला पाडून टाकावा, असे आव्हानच राजभर यांनी दिले आहे.

राजभर हे योगी सरकारमध्ये मंत्री असून सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. भाजपाबरोबर त्यांची युती आहे. गिरिराज सिंह यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. हे बिहारचे नेते (गिरिराज सिंह) ज्या रस्त्यावरुन चालतात. तो रस्ता त्यांच्या आजोबांनी बनवला आहे का ? जीटी रोड हा शेर शाहसुरी यांनी बनवला आहे. त्यांनी एक नवीन रस्ता बनवून दाखवावा. बोलणे सोपे असते, अशा शब्दांत राजभर यांनी गिरिराज सिंह यांचा समाचार घेतला.

नुकताच गिरिराज सिंह यांनी मुघलांशी निगडीत सर्व ठिकाणांचे नाव बदलण्यात येईल, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, भारत एक स्वतंत्र देश आहे. आता आपण मुघल किंवा इंग्रजांचे गुलाम नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत नावे ठेवण्याची काय गरज आहे ? खिल्जीने राज्याला लुटले होते हे बिहारच्या लोकांना माहीत नाही का ? तरीही बख्तियारपूर त्याच्या नावाने आहे. बिहारमधील अकबरपूरसह १०० ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. याबाबत योगी आदित्यनाथ यांचे काम चांगले आहे. बिहारसह संपूर्ण देशातील मुघलांशी निगडीत ठिकाणांची नावे बदलली जावी, अशी मागणी मी करत आहे, असे गिरिराज सिंह यांनी म्हटले होते.

राजभर यांनी आपल्याच सरकारवर व भाजपावर हल्लाबोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकताच त्यांनी बलिया येथे भाजपावर टीका केली होती. गरीब तुमच्या (भाजपा) नोटाही घेईन, कोंबडीही खाईल पण तुम्हाला मतदान करणार नाही. जर काम नाही केले तर, गोरखपूर, फुलपूर, कैराना आणि नूरपूरचा निकाल लक्षात ठेवा.