News Flash

उत्तर प्रदेश : करोनामुळे भाजपाच्या पाचव्या आमदाराचा मृत्यू; योगी सरकारमधील मंत्र्याचं निधन

मोदी, योगींनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण आणि महसूल राज्य मंत्री तसेच मुजफ्फरनगरचे चरथावल विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार विजय कश्यप यांचं मंगळवारी करोनामुळे निधन झालं. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. विजय कश्यप हे ५२ वर्षांचे होते. उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे प्राण गमावलेले ते पाचवे आमदार आहेत. यापूर्वी भाजपाच्या चार आमदारांचा करोनामुळे मृत्यू झालाय.

विजय कश्यप यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. “भाजापा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या विजय कश्यप यांच्या निधनामुळे खूप दु:ख झालं आहे. ते सर्वासामान्यांशी जोडलेले नेते होते. त्यांनी कायम लोकांच्या हिताची काम केली. या दु:खद प्रसंगी माझ्या सद्भावना त्यांच्या नातेवाईक आणि समर्थकांसोबत आहेत. ओम शांति,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय कश्यप यांच्या निधनानंतर ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. “विजय कश्यप एक लोकप्रिय नेते होते. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री म्हणून त्यांनी आपली कर्तव्य कायमच कौशल्यपूर्वक पद्धतीने पार पाडली. कश्यप यांच्या निधनामुळे जनतेने त्यांचं हीत जपणारा एक नेताम गमावाला आहे,” असं योगी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कश्यप यांच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हणत आपल्या सद्भावना कश्यप यांच्या नातेवाईकांसोबत असल्याचं सांगितलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विटरवरुन, “मुजफ्फरनगरमधील चरथावलचे लोकप्रिय आमदार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांच्या निधनामुळे मी खूप दु:खी झालोय. समाजसेवेसाठी कायमच तत्पर असणाऱ्या अशा नेत्याच्या निधनामुळे पक्षाची आणि राज्याची कधीही न भरुन येणारी हानी झालीय,” असं म्हटलं आहे.

विजय कश्यप हे भाजपाच्या तिकीटावर सन २००७ आणि २०१२ मध्ये चरथावल विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढले होते. मात्र २०१७ साली ते भाजपाच्या तिकीटावर लढून पहिल्यांदा निवडून आले. २०१९ साली ऑगस्ट महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तेव्हा विजय कश्यप यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आला होता.

यापूर्वी झालाय चार आमदारांचा मृत्यू

यापूर्वी  रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजपा आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी, ओरैया विधानसभेचे भाजपा आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचं करोनामुळे निधन झाले आहे. केसर सिंह गंगवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने फेसबुकवरून मोदी आणि योगी सरकारवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 8:11 am

Web Title: up minister vijay kashyap succumbs to covid 19 fifth bjp mla to lose battle of life scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदी-शहा आहेत तोपर्यंत तरी या संघर्षाला अंत नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण
2 Covid-19 deaths : मृत्युवाढ चिंताजनक
3 लसपुरवठय़ासाठी सातत्याने प्रयत्न -मोदी