मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्त मदत छावण्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत राहत असताना, उत्तर प्रदेशातील १७ सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यावर गेले. २० दिवसांच्या या दौऱ्यात ८ मंत्री आहेत. जनता समस्यांनी त्रस्त असताना मंत्र्यांची मौजमजा सुरू असल्याची टीका काँग्रेस आणि भाजपने केली आहे. अर्थात या शिष्टमंडळात भाजपचा एक सदस्य आहे.
तुर्कस्थान, नेदरलँड, इंग्लंड, ग्रीस आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमधील संसदीय प्रथांचा अभ्यास करण्याच्या नावाखाली या दौऱ्याचे प्रयोजन आहे. मुजफ्फर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असलेले आझ खान यांच्याकडे या शिष्टमंडळाचे नेतृत्व आहे. यामध्ये राजा भैय्या, अंबिका चौधरी, ओम प्रकाश सिंह, अभिषेक मिश्रा, भागवत शरण गंगवार, शिवकुमार बेरिया आणि योगेश सिंह यांचा समावेश आहे.
राज्यातील थंडीच्या कडाक्याने होणारे मृत्यू आणि मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांची बिकट स्थिती असताना सरकार मंत्र्यांना परदेशात पाठवते हे दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. २० दिवस इतके मंत्री बाहेर असतील तर कामे कशी होणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते अखिलेश प्रताप सिंह यांनी विचारला आहे. या शिष्टमंडळात भाजपचाही एक सदस्य असताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते विजयबहादूर पाठक यांनी या सत्ताधारी जनसेवेऐवजी मौजमजा करण्यात दंग असल्याचे टीकास्र सोडले आहे. १७ जणांच्या शिष्टमंडळात आठ मंत्री, समाजवादी पक्षाचे तीन आमदार, भाजप व राष्ट्रीय लोकदलाचा प्रत्येकी एक आमदार, विधानसभेचे मुख्य
सचिव प्रदीप दुबे यांचा समावेश आहे.

‘ही समाजवादी परंपरा’
एकीकडे या दौऱ्यावरून अखिलेश यादव सरकारवर टीका सुरू असताना दोन आठवडे सुरू असलेल्या सैफई महोत्सवावर जोरदार टीका होत आहे. या महोत्सवासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. बुधवारी या महोत्सवात सलमान खान, माधुरी दीक्षित यांचा सहभाग आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत हा महोत्सव म्हणजे समाजवादी परंपरेचा भाग असल्याचे अजब समर्थन केले आहे.