मुस्लिम समाजाने भाजपच्या उमेदवारांना मत दिली तर ते सुखात राहतील. अन्यथा त्यांनी कष्ट झेलण्याची तयारी ठेवावी, असा इशाराच भाजपच्या एका नेत्याने दिला आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडला. भाजपचे नेते रणजीत कुमार श्रीवास्तव यांची पत्नी ही निवडणूक लढवत आहे. यासाठी १३ नोव्हेंबर रोजी नवाबगंज परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्तर प्रदेश सरकारमधील दारा सिंग चौहान आणि रमापती शास्त्री दे दोन मंत्रीही व्यासपीठावर उपस्थित होते. तेव्हा रणजीत श्रीवास्तव यांनी उघडपणे मतदारांना धमकावले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कैद्यांमध्ये भेदभाव न करण्याचे आदित्यनाथ यांचे आदेश

हे समाजवादी पक्षाचे सरकार नाही. त्यामुळे तुम्ही आता एखाद्या पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्याकडे जाऊन स्वत:चे काम करू शकत नाही. तुमच्यातील कोणताही नेता तुमच्या मदतीला येणार नाही. एखाद्या विभागातील रस्ते, गल्ल्या आणि नाल्यांशी संबंधित प्रश्न हे महापालिकेच्या अखत्यारित येतात. तुम्ही सध्या काही समस्यांचा सामना करत असाल. तसेच भाजपमध्ये तुमची बाजू घेणारा एकही प्रतिनिधी नाही. त्यामुळे तुम्ही निवडणुकीत आमच्या उमेदवारांना मते दिली नाहीत तर तुम्ही स्वत:हून आपल्यात दरी निर्माण कराल. त्यावेळी समाजवादी पक्ष तुमच्या मदतीला येणार नाही. सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत ज्या कष्टांची केवळ कल्पना केली असेल ते तुम्हाला प्रत्यक्षात भोगावे लागतील. त्यामुळे मी मुस्लिमांना एवढेच सांगू इच्छितो की, आम्हालाच मतं द्या. मी तुमच्याकडे भीक मागत नाही. आम्हाला मतं द्याल तर सुखी राहाल. अन्यथा तुम्हाला भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या कष्टांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असे रणजीत श्रीवास्तव यांनी म्हटले. रणजीत श्रीवास्तव हे नवाबगंज नगरपालिकेचे मावळते नगराध्यक्ष आहे. यंदा त्यांचा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

कायदा पाळायचा नसेल तर उत्तर प्रदेश सोडा!: योगी आदित्यनाथ