पाच राज्यांबरोबर उत्तर प्रदेशातही पंचायत समिती निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीचे निकाल लागले असून, चित्रही स्पष्ट झाले आहे. पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला झटका बसला असून, अयोध्या-मथुरेतील निकालांने रेड सिग्नलच दाखवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्येही भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्या अटीतटीची लढाई बघायला मिळाली. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत असल्यानं या निकालाला महत्त्व आलं आहे.

उत्तर प्रदेशात नुकत्याच पंचायत समिती निवडणुका झाल्या. तब्बल ३,०५० जागांसाठी निवडणूक झाली असून, निकालही घोषित करण्यात आले आहेत. या निकालाने भाजपाला खडबडून जाग केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्येही समाजवादी पक्षाने भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे. तर अयोध्या आणि मथुरेतील निकालही भाजपासाठी निराशाजनक ठरले आहेत.

अयोध्येत पंचायत समितीच्या ४० जागांसाठी निवडणूक झाली. यात भाजपाला केवळ ६ जागाचं मिळाल्या आहेत. तर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. २४ जागा जिंकत समाजवादी पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने ५ जागा जिंकल्या आहेत. मथुरेतील निकालही भाजपाला सर्तकतेचा इशारा देणारे आहेत. मथुरेत ३३ जागांसाठी निवडणूक झाली. यात भाजपाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. मायावती यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने मुथेरत मुसंडी मारली असून, १३ जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दल अर्थात आरएलडीला एक जागा मिळाली आहे.

गोखरपूरमध्ये पंचायत समितीच्या ६८ जागांसाठी निवडणूक झाली. इथे भाजपा आणि समाजवादी पक्ष यांच्या चुरशीची लढाई झाली. भाजपा आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी २० जागा जिंकल्या आहेत. तर २३ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. आप, काँग्रेस आणि निशाद पक्ष यांनी प्रत्येकी १ जागा जिंकली आहे. “हा समाजवादी पक्षाच्या धोरणांचा आणि विचारांचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे माजी मंत्री पवन पांडेय यांनी निकालावर बोलताना दिली. पक्षाने फक्त अयोध्येत ४० पैकी २३ जागाच जिंकल्या नाहीत. तर ९० टक्के जिल्ह्यांमध्ये आघाडीवर आहे.