उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला आहे. ईशान्य भारतात डाव्या पक्षांच्या पराभवाचा हवाला देत त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. सुर्योदयावेळी सुर्याचा रंग केशरी होतो आणि सूर्यास्तावेळी लाल रंग होतो. समाजवादी पक्षाच्या टोपीचा रंगही लाल असून त्यांच्या अस्ताची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार कौशलेंद्र सिंह पटेल यांच्या समर्थनात नवाबगंज येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आधीच्या सप सरकारवर भेदभावाचा आरोप केला. पूर्वीच्या सप सरकारवेळी वीज राज्यातील फक्त चार जिल्ह्यांना मिळत होती. पण आम्ही राज्यात विजेचे समान वितरण धोरण आखल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपासरकारकडून विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. विकासात कोणताच भेदभाव नाही. मग ते गोरखपूर असो किंवा अलाहाबाद, लखनऊ आणि आग्रा, सर्वांचा समान पद्धतीने विकास केला जाईल. आम्ही अवघ्या १० महिन्यात गरिबांना ११ लाख घरे उपलब्ध करून दिले. ८६ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सुरूवात केली आहे. येत्या दोन वर्षांत पाच लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमचे सरकार हे विकास आणि सुशासनाचे एक प्रतिरूप असेल. तुम्ही राज्यातील सप सरकारचा कार्यकाळ पाहिला आहे. त्यावेळी प्रत्येक आठवड्याला सरासरी दोन दंगली होत. दंगेखोरांना राजकीय आश्रय दिला जात. पण मागील ११ महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये एकही दंगल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्यांनी ईशान्येकडील राज्यात भाजपने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासात्मक धोरणे व अमित शहा यांचे संघटन कौशल्य याला आहे, असे म्हटले होते. लवकरच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपाची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर हा पाचवा पराभव आहे अशी टीका त्यांनी केली. लवकरच त्यांची पराभव मालिका आणखी वेग घेईल असे ते खोचकपणे म्हणाले. त्रिपुरा, नागालँड व मेघालय विधानसभा निवडणुकांत भाजपने चांगली कामगिरी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.