मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तरुणीला पोलीस व्हॅनमध्येच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

‘सर्व चार पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि होम गार्डचा सहभाग आहे’, अशी माहिती मेरठ झोनचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांनी दिली आहे. निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे हेड कॉन्स्टेबल सालेक चांद, कॉन्स्टेबल नितू सिंह, महिला कॉन्स्टेबल प्रियांका आणि होमगार्डड सेंसरपाल अशी आहेत.

पोलिसांआधी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तरुणी आणि तरुणाला मारहाण करत पोलीस ठाण्यात नेलं होतं. पोलीस अधीक्षक रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आई-वडिलांशी बोलल्यानंतरच आम्ही तरुणीला जाऊ दिलं. ती कोणत्या दबावात नसल्याची आम्हाला खात्री करुन घ्यायची होती’. तरुणीचे पालक पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरच दोघांना सोडण्यात आलं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये होमगार्ड सेंसरपाल गाडी चालवत असल्याचं दिसत आहे. त्यानेच ही व्हिडीओ शूट केला. तरुणीच्या शेजारी बसलेली कॉन्स्टेबल प्रियांका मारहाण करत असून इतरही तिच्याशी उद्धट भाषेत बोलताना दिसत आहे. सेंसरपाल वारंवार तिला मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध ठेवायला लाज वाटली नाही का असं विचारताना दिसत आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी धाड टाकत त्यांना मारहाण केली होती. सोबतच पोलीस ठाण्याबाहेर जाऊन लव्ह जिहाद प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली होती. दरम्यान पोलीस मारहाण करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असून पोलीसदेखील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचं म्हटलं आहे.