उत्तर प्रदेशमधील झाशीमधील सर्कल ऑफिसर (सीओ) मनीष सोनकर यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. राजीनामा देताना सोनकर यांनी आपली करोनाबाधित पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याचं कारण दिलं आहे. सोनकर यांनी झाशीचे एसएसपी रोहन पी कनय यांच्यासहीत राज्यपालांकडेही राजीनाम्याची एक प्रत पाठवली आहे.

नक्की वाचा >> “तुमच्याकडे चारच दिवस बाकीयत, काय करायचंय ते करुन घ्या”; योगी अदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

एसएसपी रोहन पी कनय यांनी सोनकरांच्या राजीनाम्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं न्यूज १८ शी बोलताना सांगितलं आहे. या राजीनाम्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोनकर हे २००५ च्या तुकडीतील पीपीएस अधिकारी आहेत. सध्या ते झाशीचे सर्कल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सोनकर हे पत्नी आणि मुलीसोबत राहतात.

नक्की वाचा >> ऑक्सिजनचा तुटवडा असला तरी बोंबाबोंब कराल तर…; योगी सरकारचा रुग्णालयांना इशारा

करोना कालावधीमध्ये सोनकर हे एकाच घरात राहूनही आपल्या पत्नी आणि मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या खोलीत राहतात. मात्र दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नीला खूप ताप आला. त्यानंतर २० एप्रिल रोजी सोनकर यांनाही खूप ताप आला. तेव्हापासून आतापर्यंत सोनकर यांनी पाच वेळा करोनाची चाचणी केली जी निगेटीव्ह आली. त्यामुळे औषधे घेऊन सोनकर कामावर जात होते. सोनकर यांची पत्नी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पत्नी आणि मुलीची काळजी घेतानाच सोनकर हे स्वत: आरोग्य विषयक समस्यांना तोंड देत लॉकडाउन संदर्भातील सरकारी बैठका, तपासण्या यासारख्या गोष्टींसाठी हजर राहत होते.

नक्की वाचा >> नायट्रोजनपासून ऑक्सिजन बनवण्याबद्दल भाष्य केल्याने योगी ट्रोल; लोक म्हणाले, ‘नावं बदलून बघा’

३० एप्रिल रोजी सोनकर यांच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आयसोलेशनमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोनकर यांची चार वर्षांची मुलगी त्याच्यासोबत राहू लागली. मुलीची सर्व जबाबदारी सोनकरांवर आली. त्याच दरम्यान पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली.

नक्की वाचा >> “धन्य ते योगीजी आणि धन्य ते मोदीजी”; भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया

सोनकर यांनी फोन करुन तसेच एसएसपींशी चर्चा करुन आपल्या परिस्थितीसंदर्भात सांगत एक मे ते सहा मेदरम्यान सुट्टी मागितली. मात्र त्यांची नियुक्ती २ आणि ३ मे पर्यंत बडागाव ब्लॉकमधील पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर करण्यात आली. यानंतर सोनकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय़ घेतला. सोनकर यांनी थेट राजीनामा दिल्याने त्यांना आता सुट्टी देण्यात आली आहे. त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. या प्रकऱणामध्ये कानपूर झोनचे एडीजी भानु भास्कर यांनी आपल्याला या प्रकरणाची माहिती असून यासंदर्भात सहानुभूतीच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं.