इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला शुक्रवारी रात्री दिल्लीमधून अटक झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर आहेत. अबू युसूफ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो उत्तर प्रदेश बलरामपूरचा आहे. “दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून आयईडीसह दहशतवाद्याला अटक केल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उत्तर प्रदेश पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत” असे उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून चकमकीनंतर दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे १५ किलो आयईडी स्फोटके सापडली. अबू युसूफकडून काही शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत. दोन प्रेशर कुकरमध्ये त्याच्याकडे १५ किलो IED होते. एनएसजी कमांडोस, बॉम्ब स्क्वाडने शनिवारी सकाळी ही स्फोटके निकामी केली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
इस्लामिक स्टेटच्या या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक दिल्लीत दाखल झाले आहे. लोधी रोडवरील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या कार्यालयात ही टीम पोहोचली आहे. अबू युसूफच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2020 12:47 pm