उत्तर प्रदेश पोलिसांचा स्वतःचा एक कायदा आहे त्यावर देशाचा कायदाही लागू होत होत नाही.  राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोन नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली यामध्ये त्यांची चूक काय? असा प्रश्न विचारत देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात एक अमानूष गुन्हा घडतो. अशावेळी संवेदना जपणाऱ्या काँग्रेस पक्षाचे दोन नेते पीडितेच्या परिवाराला भेटू इच्छितात यात त्यांची चूक काय? त्यांना अडवण्यात का आलं? धक्काबुक्की का करण्यात आली? असेही प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते हिंसक नव्हते. त्यांनी हत्यार चालवलं नाही, ते दोघेही आपला विरोध शांततेच्या मार्गाने नोंदवत होते. मग त्यांना अडवण्यात का आलं? असाही प्रश्न पी चिदंबरम यांनी विचारला आहे.

हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. तिला मारहाणही झाली. तिची जीभही छाटण्यात आली होती. यानंतर या पीडितेवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असताना या मुलीचा अंत झाला. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे हाथरस येथे पोहचले. पीडितेच्या नातेवाईकांची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना पोलिसांनी अडवलं इतकंच नाही तर पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप होतो आहे. आता या प्रकाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी या कृत्याचा निषेध म्हणून आंदोलनही करण्यात आलं.