उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरससाठी निघाले असताना हा प्रकार घडला आहे. हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं आहे. सध्या यमुना एक्स्पेस हायवेवर कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन केलं जात आहे.

राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो”. दरम्यान पोलिसांनी एएनआयशी बोलताना त्यांनी येथे येणं चुकीचं असून त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. तर राहुल गांधी मात्र मागे हटणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना सोबत देण्यासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कार्यकर्ते व इतर नेत्यांना रोखण्यात आलं. पुढे गेल्यानंतर जेव्हा पुन्हा पोलिसांनी रोखलं तेव्हा मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी केली गेली.

प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे. बलात्कार प्रकरणी एसआयटीने तपास सुरु केला आहे. एसआयटी टीम आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. परिस्थिती पाहता प्रसारमाध्यमांना परवानगी दिली जाणार नाहीये. दरम्यान १४४ कलम लागू असल्याने जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.