काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात भाजप नेत्याला इंगा दाखवणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याची अखेर राजकीय दबावामुळे बदली करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात श्रेष्ठा ठाकूर यांचा स्थानिक भाजप नेत्याची खरडपट्टी काढणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हे स्थानिक नेते आणि आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाऊन भेटले होते. योगी आदित्यनाथांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांतच श्रेष्ठा ठाकूर यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्यासोबत आणखी काही पोलीस उपअधिक्षकांचीही बदली करण्यात आल्याचे समजते.

श्रेष्ठा ठाकूर या बुलंदशहरच्या स्याना पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक पंचायतीमधील भाजपचे सदस्य प्रमोद लोधी यांच्याविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावरून त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरूवात केली. हा वाद बाचाबाचीपर्यंत पोहचला. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद लोधी यांना अटक केली होती. प्रमोद लोधी यांना न्यायालयात आणण्यात आले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांविरुद्ध घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यावेळी श्रेष्ठा ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले. स्थानिक पोलीस वाहतुकीच्या नियमांचा धाक दाखवून लाच उकळायचे आणि श्रेष्ठा ठाकूर केवळ भाजपच्या लोकांवरच कारवाई करायच्या, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते श्रेष्ठा ठाकूर यांच्या बदलीसाठी दबाव आणत होते. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, आता हे नेते श्रेष्ठा ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत श्रेष्ठा ठाकूर योगी आदित्यनाथ यांचे नाव वारंवार उच्चारताना दिसत आहेत. भाजप कार्यकर्त्यांची तपासणी करायची नाही, असे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आणावे, असे श्रेष्ठा यांनी म्हटले होते. मात्र, स्थानिक नेते मुकेश भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार श्रेष्ठा ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि भाजपच्या अन्य नेत्यांबद्दल अपशब्द उच्चारले. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई हा आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे भारद्वाज यांनी म्हटले. श्रेष्ठा ठाकूर यांची बदली आता उत्तर प्रदेशच्या बहराइच येथे करण्यात आली आहे.