उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीत बोट उलटल्याने 3 महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण बेपत्ता झालेत. सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सोमवारी संध्याकाळी कीडगंड ठाणे क्षेत्रात 14 जणांना घेऊन जाणारी ही बोट मनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीमध्ये उलटली. बोटीत महाराष्ट्रातील 12 आणि स्थानिक 2 असे एकूण 14 जण प्रवास करत होते. हे भाविक याठिकाणी अस्थी विसर्जनासाठी गेले होते अशी माहिती आहे.


सोमवारी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. बोटीत अचानक छिद्र पडल्याने पाणी आतमध्ये आलं आणि हेलकावे घेत ही बोट उलटल्याचं समजतंय. या घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला. मृतांचं वय साधारण 55 ते 60 वर्षाच्या आसपास असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. याशिवाय 5 जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. तर उर्वरित सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बोटीवरील सर्वजण महाराष्ट्राच्या लातूर, नांदेड आणि परभणी येथील आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. बेपत्ता असलेल्यांच्या बचावासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना पाठवण्याचे आदेश दिले आहेत.