जवळजवळ एका दशकाहून अधिक काळ शिक्षक म्हणून काम केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील एका शिक्षकाने नोकरीबरोबरच शेतीकडे आपला मोर्चा वळवला. केवळ आवड म्हणून शेती न करता त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत या शिक्षकाने नोकरीमध्ये मिळणाऱ्या पगाराच्या अनेक पट उत्पन्न घेतलं आहे. “मी एका मोठ्या शाळेत शिक्षक होतो. तिथे मला महिन्याला एक लाख २० हजार रुपये पगार मिळतो. आता मला शेतीमधून वर्षाला ३० लाखांचे उत्पन्न मिळतं,” असं अमरेंदर प्रताप सिंह सांगतात. अमरेंदर आधी बाराबंकी जिल्ह्यातील दौलतापूर गावातील सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामही करतात.

अशी झाली सुरुवात

राज्याच्या राजधानीपासून तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या गावामध्ये अमरेंदर राहतात. विशेष म्हणजे अमरेंदर यांनी शेती करण्यास सुरुवात केल्यानंतर केवळ स्वत:च यामध्ये पैसा कमवलेला नाही. अमरेंदर यांनी इतर शेतकऱ्यांनाही प्रायोगिक शेतीसंदर्भात मार्गदर्शन केलं आहे. “मी शाळेमध्ये शिक्षक होतो. मी लखनऊमध्ये माझ्या कुटुंबासोबत रहायचो. २०१४ ला शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली तेव्हा या सुट्ट्यांमध्ये मी गावी जाऊन कुटुंबाच्या मालकीच्या ३० एकर शेतामध्ये काहीतरी पीक घेण्याचा निर्णय घेतला,” असं अमरेंदर आपल्या या शिक्षक ते शेतकरी बननण्याच्या प्रवासाबद्दल ‘द बेटर इंडिया’शी बोलताना सांगतात.

पारंपारिक शेतीऐवजी…

युट्यूबवरील काही व्हिडीओ आणि ऑनलाइन माहितीच्या आधारे अमरेंदर यांनी एक एकर शेतीमध्ये केळी लावण्याचा निर्णय घेतला. “या परिसरामध्ये शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. येथील शेतकरी ऊस, धान्य आणि गव्हासारखी पारंपारिक पिकं घेतात. मात्र यामधून त्यांना फारसा नफा होत नाही. ऊसासारख्या पिकातून उत्पन्न मिळवण्यासाठी तर दोन वर्ष वाट पहावी लागते. या पिकांसाठी खूपच वाट पहावी लागते आणि त्याचा फारसा आर्थिक फायदाही होत नाही,” असं अमरेंदर सांगतात. त्यामुळेच आपण वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतल्याचं अमरेंदर यांनी सांगितलं.

केले हे प्रयोग

“मी केळ्याचं पिक घेण्यास सुरुवात केली आणि मला यश मिळू लागलं. त्यानंतर पुढील वर्षी मी यामध्ये मिश्र पिकं घेण्याचा निर्णय घेतला. केळीच्याच शेतात हळद, आलं आणि फ्लॉवरचे पिक घेतल्यास त्याचा जास्त फायदा होईल असं समजलं आणि मी ही पिकं घेण्याचं ठरवलं. आल्याचा फारसा फायदा झाला नाही मात्र हळदीचे पिक चांगलं आलं. केळ्याच्या बागेसाठी केलेल्या गुंतवणुकीचा खर्च हळदीमधून भरुन निघाला. केळं विकून मला निव्वळ नफा झाला,” असं अमरेंदर स्पष्ट करतात.

अमरेंदर यांना शेतीमध्ये यश मिळ्यानंतर ते कायमचे दौलतापूरला स्थायिक झाले. “त्यानंतर मी कलिंगड, टरबूज आणि बटाट्याचे पिक घेतलं. मी नंतर अनेक ठिकाणी वेगवगेळ्या पिकांचे उत्पादन कसं घेतलं जातं हे पाहिलं. युट्यूबवर अनेक व्हिडीओ आणि माहितीच्या आधारे मी स्ट्रॉबेरी, शिमला मिर्ची आणि मशरुमची शेती केली,” असं आपल्या प्रायोगिक शेतीबद्दल बोलताना अमरेंदर यांनी सांगितलं.

वेगवेगळ्या अनुभवांनंतर अमरेंदर यांनी अशाप्रकारे पिकांची निवड सुरु केली की एका पिकाला नुकसान झालं तरी ते दुसऱ्या पिकासाठी खत म्हणून वापरता येईल. त्यामुळे नुकसान होण्याऐवजी शेतीला फायदाच झाला. वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान आणि शेतीचे प्रयोग करत अमरेंदर यांनी अनेक पिकांमधून नफा मिळवला.

३० एकरमधून ६० एकरांपर्यंत विस्तार

सहा वर्षामध्ये अमरेंदर यांनी आपली शेती ३० एकरांमधून ६० एकरांपर्यंत वाढवली आहे. स्वत:च्या ३० एकरांबरोबरच २० एकर जमिनीवर भागिदारीत तर अन्य दहा एकर जमीन विकत घेऊन अमरेंदर आता शेती करतात. त्यांनी कोथिंबीर, आलं आणि मक्यासारखी पिकंही घेतली आहेत. “३० एकर जमीनीवर फळं आणि भाज्यांचे उत्पादन घेतलं जातं तर उर्वरित जमिनीवर ऊस, गहू आणि डाळींचे उत्पादन घेतलं जातं. या ६० एकरामधून एक कोटी रुपयांचे उत्पादन मिळते. ज्यापैकी ३० लाख रुपये निव्वळ नफा आहे,” असं अमरेंदर यांनी द बेटर इंडियाशी बोलताना सांगितलं.

विरोध आणि कौतुकही

ठिपक सिंचन, तुषार सिंचनासारख्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात शेती करणं शक्य झालं आहे. शेतातील कामांसाठी अनेकदा अमरेंदर हे अगदीच आवश्यकता असल्यास बिनपगारी सुट्टीही घेतात. “मी शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा अनेकांनी हा चुकीचा निर्णय असल्याचे मला सांगितलं. माझ्या अनेक नातेवाईकांनी मला लोकं शेती सोडून योग्य पैसा मिळावा म्हणून इतर उद्योग करतात असंही सांगितलं होतं. मात्र माझा उलट प्रवास झाला,” असं अमरेंदर सांगतात. मात्र टीका आणि विरोध करणाऱ्यांबरोबरच माझ्या निर्णयाचे स्वागत करणारेही अनेकजण होते असंही अमेरंदर यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनाही करतात मदत

अमरेंदर यांना शेतीमध्ये मिळालेलं यश पाहून ३५० शेतकऱ्यांनी एकत्र येत पारंपारिक शेती ऐवजी प्रायोगिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शेतकरी सध्या अमरेंदर यांच्या सल्ल्यानुसार अनेक प्रयोग करत आहेत. “अमरेंदर आणि मी एकाच शाळेत होतो. त्याचे शेतीतील यशस्वी प्रयोग पाहून मी सुद्धा माझ्या शेतात प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी २०१५ साली एक एकरामध्ये केळ्याचं पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि सर्व तंत्रज्ञान शिकून घेतलं,” असं अमरेंदरचे जवळचे मित्र असणारे नरेंद्र शुक्ला सांगतात. आर्थिक नफा कमवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अमरेंदर यांच्या मार्गदर्शनाखाली भाज्यांची शेती सुरु केल्याचेही नरेंद्र सांगतात. “६० दिवसांमध्ये पिक हाती येतं त्यामुळे याचा बराच फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो आणि हा पैसा पुढील पिकासाठी गुंतवता येतो,” असं नरेंद्र सांगतात.

नोकरी सोडणार पण…

“जास्त धोका पत्कारल्यास जास्त फायदा होण्याची शक्यता असते असं माझं मत आहे. सध्या शेतमाल बाजारपेठेत नेणं हीच एकमेव मोठी अडचण आहे. ७० किमीवर असणाऱ्या लखनऊमध्ये शेतमालाची बाजरपेठ आहे. एकदा फेरी मारण्यासाठी २०० रुपयांचे इंधन जाते. तसेच मालाला योग्य भाव मिळाला नाही किंवा तो वेळेत विकला गेला नाही तर नुकसानही तितकेच होते. प्रत्येक शेतकऱ्याला अडचणींचा समाना करावा लागतो. मला या बाजारपेठेतील मधली साखळी तोडून थेट ग्राहकांपर्यंत पोहचायचं आहे. मी यासंदर्भात आता काम करत आहे,” असं अमरेंदर सांगतात.

शेतीमध्ये एवढं यश मिळवल्यानंतरही अमरेंदर यांनी अद्याप आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. “हो मी त्याबद्दल विचार करत आहे. मला सध्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचा परवाना मिळाला आहे. फळांपासून रस बनवण्याची परवानगी मला मिळाली आहे. मी एकदा त्याची सर्व व्यवस्था केली तर मी नोकरी नक्कीच सोडेल,” असं अमरेंदर यांनी सांगितलं आहे.