लखनौ : राष्ट्रीय नागरिक नोंदणीपासून भारतीय मुस्लिमांना काहीही धोका नाही, असे सांगून उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने एनआरसीच्या अंमलबजावणीला अनुकूलता दर्शवली आहे.

‘हिंदुस्थानी मुस्लिमांना राष्ट्रीय नागरिक नोंदणीपासून काहीही धोका नाही. देशात तिची अंमलबजावणी व्हायला हवी. खरा मुद्दा देशाला ज्यांच्यापासून धोका आहे, अशा घुसखोरांची ओळख पटणे हा आहे’, असे बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले. घुसखोर हे तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मतपेढी आहेत. बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील घुसखोरांची मतदार ओळखपत्रे काँग्रेस तयार करत आहे. एनआरसी अमलात आल्यास त्यांचा खरा चेहरा उघड होईल, असे रिझवी यांनी सांगितले.  इतर देशांतील हिंदू अत्याचारांमुळे भारतात आले आहेत; तर याच देशांतील मुस्लीम ‘वैयक्तिक फायद्यासाठी किंवा भारताला हानी पोहचववण्यासाठी’ येथे आले आहेत. केवळ भारतीय मुसलमान हे हिंदुस्थानी आहेत. उर्वरित घुसखोर असून त्यांनी देश सोडून निघून जायला हवे, असेही रिझवी यांनी आवर्जून सांगितले.